Breaking News
Home / ॲग्रो संवाद / लोकांना गृहीत धरणे भोवले ?

लोकांना गृहीत धरणे भोवले ?

साभार : www.vishalraje.com

मतदारांना गृहीत धरणे यापुढे चालणार नाही, हा सरळ – सरळ इशारा यावेळी मतदारांनी सत्ताधारी भाजप – शिवसेेनेला दिला आहे. हाच इशारा हरियाणातील जनतेनीही दिला. सातत्याने इलेक्शन मोडमध्ये असलेल्या भाजप नेत्यांसह पंतप्रधानांनाही हा इशारा लक्षात आला, तरच पुढील वाटचाल विनासायास सुरू राहिल. अन्यथा ’मुकी बिचारी कुणीही हाका’ हा प्रकार यापुढे बाद होईल, हे निश्‍चित. मतदारांनी उमेदवारांची गुणवत्ता तपासतानाच पुन्हा भाजप – शिवसेनेच्या सरकारवर विश्‍वास दर्शविला. मात्र, आयाराम – गयारामांसह सत्तेमुळे उन्मत्त झालेल्यांना त्यांची जागा दाखवून दिली. निवडणूक निकालांचा अर्थ काढल्यास गेल्या सहा महिन्यांपासून युतीच्या नेत्यांचे टार्गेट शरद पवार का होते, याचे कारण स्पष्ट होते.

निवडणुकीचे निकाल काही ठिकाणी अनपेक्षित, काही अपेक्षित तर काही अनाकलनीय असे लागले. जनतेचा कौल मान्य केल्याशिवाय राजकीय पक्षांकडे काहीही उपाय नसतो. दर पाच वर्षांनी येणार्‍या लोकशाहीतील या परीक्षेतून काही धडा घेतला तरच पुढची वाटचाल सूकर होते, याचे भान मात्र सर्वांना ठेवावे लागते. जनतेने फैसला सुनावला, त्यात विद्यमान सरकारवर विश्‍वास दर्शवत असतानाच मतदारांनी अनेक दिग्गजांना नाकारले. आम्हाला गृहीत धरुन राजकारण करू नका किंवा सत्तेत राहायचे म्हणून काहीही खपवून घेणार नाही, हेच मतदारांना या निवडणुकीत सांगायचे होते, असे निकाल पाहिल्यानंतर दिसते. भाजप – 104, शिवसेना – 57, राष्ट्रवादी काँग्रेस – 53, काँग्रेस – 46 व इतर – 28 अशी आकडेवारी मतदानयंत्रातून बाहेर आली आहे. भाजप – शिवसेनेने मिळून बहुमताचा 145 चा जादुई आकडा पूर्ण केला. त्यातच इतर म्हणजे अपक्ष किंवा लहान पक्षांमधून निवडून आलेल्यांची संख्या 30 आहे. यापैकी किमान 12 ते 15 जण हे भाजपचे बंडखोर आहेत. म्हणजेच युतीची सरकार स्थापनेच्या वेळी संख्या 175 ते 180 च्या जवळपास जाईल. या संख्येची जुळवाजुळवी करण्यासाठी अतिआत्मविश्‍वासाने निवडणुकीला सामोरे जाणार्‍या भाजप – शिवसेनेला खूप सव्यापसव्य करावे लागले, हे मात्र खरे.

गृहीत धरता येणार नाही –
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मतदारांनी युतीला गेल्या निवडणुकीसारखे भरभरुन दान दिलेले नाही. हा प्रदेश आपलाच गड आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे यातून सूचित झाले आहे. मतदारांनी सरकार निवडले, पक्ष म्हणून युतीला पुन्हा संधी दिली. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेले होते, त्यांच्यावरही मतदारांनी पुन्हा विश्‍वास ठेवला. पण त्यांना काही धोकेही दाखवून दिले आहेत. त्यातील हा पहिला धोका आहे. जनतेला गृहीत धरुन राजकीय खेळी यापुढे चालणार नाही. सत्तेची मस्ती कोणाचीच सहन करणार नाही, हे स्पष्टपणे ऐकू यावे, अशी या निकालांची आकडेवारी आहे. भाजपने विद्यमान 22 आमदारांना उमेदवारी नाकारली, तरीही ज्यांच्यात सत्तेमुळे ताठा आला होता, सत्ताधारी असल्याचा गर्व होता, त्यांचे गर्वाचे घर खाली आणले गेले. युतीला मतदान करताना मतदारांनी उमेदवारालाही महत्व दिल्याचे दिसले. युतीचा उमेदवार म्हणून कोणालाही निवडून दिले, असे झालेले नाही. सत्ताधारी पक्षाने दगडही उभा करावा आणि तो निवडून यावा, हे दिवस राज्यातील राजकारणात संपले आहेत, हेसुद्धा यातून स्पष्ट झाले. तर सत्ता मिळते किंवा वैयक्तिक लाभ होतो म्हणून बेडूकउड्या मारणार्‍यांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, हेसुद्धा मतदारांनी सांगून टाकले आहे. म्हणूनच विदर्भ गड मानणार्‍या भाजपला तिथे सपाटून हार पत्करावी लागली. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भावनेचे राजकारण करणार्‍या शिवसेनेलाही या निवडणुकीत फारसे काही मिळविता आले नाही. सातार्‍यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तर उघड – उघड मतदारांनी उदयनराजे भोसलेंना नाकारुन राजकीय कोलांटउड्यांना विरोध दर्शविला. सत्तेची झापडे डोळ्यावर ओढलेल्या काही विद्यमान मं÷त्र्यांनासुद्धा मतदारांनी घरचा रस्ता दाखवला.

अल्पसंख्याकांचे राजकारण –
राहिला विषय काँगे्रसच्या यशाचा तर त्यांना लॉटरी लागल्यासारखी परिस्थिती आहे. प्रचारात कुठेही नसलेल्या काँग्रेसने गेल्या वेळेप्रमाणेच संख्या कायम ठेवली, हा चमत्कार नाही. राजकारणात असे चमत्कार होत नाहीत. काँग्रेसला झालेले मतदान हे मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक किंवा मुस्लिम मतदारांचे आहे. मुस्लिमांना सध्याच्या राजकारणात सक्रीय प्रतिनिधित्व मिळत नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या संख्याबळाकडे पाहता म्हणता येईल. मुस्लिमांच्या मतांवर राजकारण करणार्‍या एमआयएमचा लाभ शिवसेना – भाजपला होतो, हे उघड गुपित आहे. त्यामुळे एमआयएमच्या माध्यमातून युतीला विरोध करण्यापेक्षा थेट काँग्रेसच्या पाठीशी यापुढे मुस्लिम मतदार उभा राहिल, याचे हे संकेत आहेत.

पवारांची पॉवर –
राज्यात युतीच्या अश्‍वमेधाचा अश्‍व रोखण्याची राजकीय शक्ती जर कोणात असेल तर ती शरद पवारांमध्ये, हे भाजपच्या केव्हाच ध्यानात आले आहे. त्यामुळेच पवारांना सुरुवातीपासून टार्गेट करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपात ’पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले’ असा प्रश्‍न विचारत अमित शहा यांनी पवार हेच टार्गेट असतील, ही भूमिका जाहीर केली. निवडणुकीच्या तोंडावरसुद्धा पवारांविरुद्ध ईडीची कारवाई, राज्य बँकेतील घोटाळ्यांचे आरोप आणि अनेक आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. शरद पवारांचा राज ठाकरे करण्याचा प्रयत्न सुरू होता. म्हणजे पवारांना इतके बदनाम करायचे की त्यांनी काहीही सांगीतले तरीही मतदारांनी गांभीर्याने घेऊ नये, असा प्रयत्न सुरु होता. या प्रयत्नाला बर्‍यापैकी यश आले. पवार म्हणजे भ्रष्ट, पवार म्हणजे भ्रष्टाचारी, पवार म्हणजे सत्तालोलूप राजकारणी हे बिंबविण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. पण पवारांच्या मदतीला सातार्‍यातील भर पावसातील सभा आणि बर्‍यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसची सोशल मिडिया टीम धावून आली. त्यातच पवारांची मतदारांना भावनिक साद आणि त्यांच्या परिश्रमांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा दहापेक्षा अधिक जागांवर यश मिळविता आला. पवारांना अडकविण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांनी केला नसता तर राष्ट्रवादीचे संख्याबळ कदाचित अजून वाढले असते.

About Editor Desk

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *