धारणी : सध्याच्या स्पर्धात्मक युगात सकस, निर्भेळ, नैसर्गिक अन्नधान्याला केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मागणी आहे आणि निसर्गाने विदर्भातील मेळघाट परिसरात अमुल्य अश्या जैवविविधतेचे भांडार मुक्तहस्ताने दिले असून आदिवासी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत करण्याच्या कृषी विद्यापीठाच्या गत काही वर्षांपासूनच्या प्रयत्नांना मेळघाट परिसरातील शेतकरी बांधवांनी आत्मसात करीत स्वतःसह परिसराचा आणि पर्यायाने शेती क्षेत्राचा विकास साध्य केला आहे असे मौलिक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत राष्ट्रीय बीज प्रकल्प तसेच अखिल भारतीय तृणधान्य प्रकल्प, आदिवासी उप-योजना अंतर्गत नुकतेच कृषी तंत्र विद्यालय, धारणी येथे सर्वार्थाने सुसज्य प्राथमिक प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण तसेच नियोजित बियाणे प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन आणि आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. भाले बोलत होते. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि मैत्रीसारख्या सेवाभावी संस्थांची मदत यातून भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा मेळघाट ब्रांड निर्मितीचे उद्दिष्ट दृष्टिपथात असल्याचे आशावादी प्रतिपादन सुद्धा डॉ. भाले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात केले. मेळघाटाच्या प्रगतीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारे आमदार राजकुमार पटेल, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, यांचेसह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, मैत्री ग्रुप, पुणे चे श्री. शिरीष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अमरावती श्री अनिल खर्चान, निम्न कृषी शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबाराव सावजी, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (ज्वारी) डॉ. आर.बी घोराडे, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे, बियाणे संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली आखरे, प्राचार्य,कृषी तंत्र विद्यालय, धारणी श्री. अरविंद मकेसर आदींची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
मेळघाट परिसरात नानाविध वैविध्यता असून कृषी विद्यापीठाच्या सहयोगातून आदिवासी बांधवांच्या जीवनात खऱ्या अर्थाने क्रांती आली असून आता आदिवासी बांधव समजून सवरून शेती करीत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे दिसत असल्याचे आनंददायी प्रतिपादन मेळघाट परिसरासाठी आपले आयुष्य झोकून देणारे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी याप्रसंगी केले, तर दुर्लक्षित मेळघाट परिसराला विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने विकासाची वाट गवसली असून आदिवासी शेतकरी बांधव आता आपल्या क्षमतांचा आणि ज्ञानाचा व्यावहारिक वापर करायला शिकले आहेत व यातूनच भविष्यातील सुजलाम-सुफलाम मेळघाट निर्माण होणार असल्याचे मत आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर.बी.घोराडे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (ज्वार)यांनी केले तर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे,संचालक विस्तार शिक्षण, डॉ.राजेंद्र गाडे यांच्यासह मैत्री परिवार पुणेचे श्री शिरीष जोशी यांनी देखील या प्रसंगी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीजप्रक्रिया तथा बीजोत्पादन विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा आदिवासी विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तथा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख पारितोषिके व प्रमाणपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमाचे निमित्त आदिवासी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठांचे वाटप आदिवासी उपयोजनेअंतर्गत तथा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी तंत्र विद्यालय धारणी चे प्राचार्य सर्व कर्मचारी तथा बियाणे संशोधन विभाग डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे प्रमुख आणि त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.