चिखली : अलीकडच्या काळात बदलत्या कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक कारणांमुळे बहुसंख्य पालकांचे नकळतपणे मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. असे दिसून येते . कोविड -१९ मुळे सुमारे गेले दोन वर्षे सर्वच शाळा बंद आहेत . परिणामी शिक्षण व शिक्षकांचा संबंध तुटला आहे . दररोजच्या सोबत्यांचा सहवास नाही . शाळेचा व शाळेतील वातावरणाशी सुध्दा प्रत्यक्ष संबंध नाही . तीन चार वर्षें ते दहा अकरा वर्षांची मुले-मुली बरेचसे आईच्या तसेच कौटुंबिक सहवासात व शाळेत घडत असतात . बालकांना गुंतवून ठेवण्यासाठी आई त्यांच्या हातात मोबाईल देतात . पुढे मुले-मुली मोबाईल ॲडिक्ट होतात . दोन वर्षांपूर्वी जे मुले-मुली चार पाच वर्षांचे असतील ते ऑनलाईन शिक्षणाचा कोणताही किंवा फारसा लाभ घेऊ शकले नसावेत .
याशिवाय सर्वच मुले-मुली आपापल्या कौटुंबिक घरात कोंडलेल्या अवस्थेत आहेत . त्यांना बाह्य जग माहीत नाही . ते खेळू फुलू शकलेले नाहीत . याच काळात जन्माला आलेली मुले-मुली कदाचित शारिरीक कमजोरी सह बोलण्यात मागे पडू शकतात . कोरोना मुळे अनेक कुटुंबात कौटुंबिक पातळीवर सामंजस्य निर्माण होऊन वाढलेले आहे . तर काही कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन कौटुंबिक स्नेहभाव कमी होत आपसात बरीच कटुता निर्माण झाली आहे . ह्या सर्व गोष्टींचा चांगला वा वाईट परिणाम बालमनावर होत असतो . अर्थात हे सर्व दुष्परिणाम पालकांच्या लक्षात येत असतात . परंतू दुर्दैवाने प्रयत्न करूनही ह्यातील काही अनिष्ट परिणाम सहजासहजी थांबवता येत नाहीत . हे देखील खरे आहे . कोरोना महामारीचे संकट हेच अलीकडच्या काळातील बालकांचे मानसशास्त्र व शरिरशास्त्र बिघडवणारे एक प्रमुख कारण मानायला हरकत नाही . असे असले तरी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व मायक्रो न्यूक्लिअर कुटुंबातील मर्यादांमुळे बालकांना हसणे , खेळणे , बागडणे वा फुलणे जमत नाही . याचाही एक दुष्परिणाम बालकांच्या कोमेजण्यावर झाल्याशिवाय राहत नाही . मायक्रो न्यूक्लिअर कुटुंबातील बहुतांशी बालकांना सामाजिक जीवनातील नातेसंबंधांची फारशी माहिती नसते . शाळेत शिकवलेल्या बहिण , भाऊ , काका , काकू , मावशी , आत्या , मामा मामी इत्यादी नात्यांचा प्रत्यक्ष अनुभव मायक्रो न्यूक्लिअर कुटुंबातील बालकांना असत नाही . कारण अनेक कुटुंबात एकटाच मुलगा वा मुलगी असते .
दोन तीन पिढ्यांपासून काही निवडक कुटुंबातील सदस्य हीच परंपरा पुढे नेत असताना दिसतात . अशा परिस्थितीत कुटुंबातील अन्य नातेगोते निर्माण होत नाहीत . ही उणीव भरून काढण्यासाठी शेजारी पाजारी सामाजिक संस्था उपयुक्त ठरतात . तसेच काही निवडक कुटुंबे उच्च कुलीन , उच्च वर्गीय , हायफाय वा तत्सम इतर कारणांमुळे आपल्या मुलांना एका मर्यादित कोंदट वातावरणात वाढवतात . त्यांना बाहेर जाऊन शेजारच्या वा परिसरातील मुलामुलींच्या सोबत मिक्स होऊ देत नाहीत . बहुतेक बहुजन समाजातील आजचे स्वत:ला उच्च वर्गीय समजणारे कुटुंबे आर्थिक शैक्षणिक पार्श्वभूमीवर शहरी फुगीर होत मार्क्सच्या सिद्धांतानुसार उच्च वर्गीय झालेले आहेत . प्रत्यक्षात त्यापैकी बरेचसे कुटुंबे एकेकाळी दरिद्री , अशिक्षित , गावकुसाबाहेरील होते असे लक्षात येते . तकलादू मोठेपणाचा तोरा मिरवणाऱ्या पालकांना आपली लहान मुले मुली शेजारी पाजारी जाऊ नयेत असे वाटत असते . कारण अनेकदा शेजारी पाजारी सामान्य कुटुंबे राहत असतात . तर आपल्यापेक्षा वरच्या वर्गातील कुटुंबातील मुले-मुली दूर राहतात वा ते आपल्याला दूर ठेवतात . मायबापांची गोची होते . हा अपमान सहन करावा लागतो . परिणामी असे पालक त्याचा राग मुलांवर काढतात . आणि मुलांना जास्तीत जास्त वेळ घरात कोंडून ठेवतात . यामुळे उर्जित मुलांची सकारात्मक क्रयशक्ती नकारात्मक क्रयशक्ती मध्ये रुपांतरीत होते . त्यातूनच मुले-मुली हायपर होतात . चिडचिड करतात . तोडफोड करतात . अस्ताव्यस्त राहतात . आई-वडिलांच्या बद्दल राग व्यक्त करतात . जेवत नाहीत . अभ्यासात मन लागत नाही . आई-वडिलांच्या धाकाने रोबोट सारखे वागू लागतात . आणि हेच वातावरण व विचार जास्त काळ टिकून राहिले तर मुले-मुली प्रचंड मानसिक तणावात शून्यात बघत वावरताना दिसतात . प्रचंड तणावामुळे अनेकदा घरातून पळून जातात . आत्महत्या करतात . मारामारी करतात . गैर मार्गावर जातात .. यासाठी मुले-मुली कमी तर पालकच जास्त प्रमाणात जबाबदार आहेत असे मला वाटते . मित्रांनो , मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे . त्यामुळे समुह जीवन हीच त्याची मुलभूत गरज आहे . आपल्या पैकी अनेक पालक ग्रामीण शहरी भागातील खटल्याच्या मोठ्या कुटुंबात जन्माला आले असणार . बालपणापासूनच आजूबाजूला समवयस्क अथवा तत्सम दहावीस मुले-मुली खेळायला जेवायला फिरायला पोहायला सोबतच असायचे . हे जीवन साधारणपणे तारुण्य संपेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात टिकून असते .
एकमेकांची नांवे वा टोपणनावे हीच ओळख . धर्म जाती जमाती वर्ग वर्ण गरीबी श्रीमंती कोणाच्याही मनाला शिवत नसे . असेच आपण हसत खेळत , कधी मायबापाचा मार शिव्या खात शिकलो आणि नकळत मोठे झालो . याच समुह जीवनात आपले व्यक्तिमत्त्व विकसित होत घडत गेले . हीच प्रक्रिया सुरू असते … या तुलनेत आमच्या मुलांना आपल्या बालपणापेक्षा अगदी वेगळेच कौटुंबिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक वातावरण लाभले आहे . त्यांच्या वाट्याला मायक्रो न्यूक्लिअर कुटुंब व्यवस्था आली आहे . परिणामी या पिढीला त्यांची इच्छा नसतानाही सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवले जात आहे . वरुन श्रीमंतीला साजेशे भले मोठे चांदीचे कुलूप लावून बडेजाव मिरवला जातोय !! आम्हाला घरात कोंडल्यासारखे वाटते म्हणून आम्ही बार , रेस्टॉरंट , क्लब पार्ट्या मध्ये जाऊन आवडीच्या मित्र मैत्रिणींच्या सहवासात वेळ घालवतो . हे सर्व आपले चाळे मुलांना समजत तसेच दिसत असतात . ते सुद्धा आवडीच्या परिचयातील मित्र मैत्रिणी सोबत बाहेर पडून हुंदडणे व राडा करणे यासाठी प्रयत्न करत असतात . पण आम्ही त्यांना आवर घालून त्यांचा हिरमोड करतो . फुललेली खवळलेली मुले-मुली हिरमुसली होऊन मनातल्या मनात कुढत बसतात …
मित्रांनो , आज आपली इच्छा असूनही आम्हाला जून्या खटल्याचे घर उभे करणे शक्य नाही . हे सर्व खरे आहे . पण आपण आपल्या मुलांच्या भल्यासाठी , कल्याणासाठी , भविष्यासाठी आपल्या आवडीच्या किंवा उपलब्ध असलेल्या सामाजिक खटल्याचा भाग बनू शकतो . आपल्या आजूबाजूला मराठा सेवा संघ सारख्या असंख्य समाज संस्था कार्यरत आहेत . तेथे कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात . सहकुटुंब सहपरिवार अशा ठिकाणी जोडून ठेवणे आपली गरज झाली आहे . एवढेच नाही तर यापूर्वी कधीही भासली नव्हती एवढी प्रचंड गरज आज आम्हाला सामाजिक सुरक्षिततेची झाली आहे. यासाठी आपल्या मनातील अहंगंड वा न्यूनगंड जाळून टाका व बिनधास्तपणे मराठा सेवा संघ वा आवडीच्या संस्थेत सहभागी व्हा . प्रत्येक बाबींचे फळ यशस्वीपणे पदरात पाडून घेण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात हे लक्षात घेऊन चळवळीत सहभागी झाले पाहिजे अशी सूचना आहे . वाट पाहत बसू नका . सामिल व्हा. कुटुंबातील सदस्य होऊन कार्यरत व्हा … पूर्णपणे समरस होऊन नवनवीन ओळखी करून घेणे ….. महिला व मुले मुली यांना त्यांच्या इच्छेनुसार खेळू द्या . बोलू द्या . इतरांसोबत मिक्स होऊ द्या … अगदी मोकळेपणाने , निस्वार्थपणे जगासमोर गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त पुढील एकाच महिन्यात तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनात सकारात्मक व आनंददायी बदल झाला आहे असे लक्षात येईल . मित्रांनो , चालू व पुढील भविष्यातील जगात आपल्या घरात अगणित धनसंचय असेल . गाड्या व हेलीकॉप्टर्स असतील … पण मनाला आनंददायक व प्रेरणादायी ठरतील अशी जीवाभावाची माणसे नसतील . आपले आयुष्य उत्तर काळाकडे वाटचाल करत आहे . त्याचवेळी नव्या पिढीला आयुष्याची सुरुवात करायची आहे . त्यांना आम्ही कोणता वसा वारसा हस्तांतरित करत आहोत !! त्यांच्यासाठी अत्यावश्यक असणारे भौतिक व अन्य काही निवडक बाबी जरूर साठवून ठेवा .
पण एक लक्षात ठेवा की कदाचित असे काही नसले तरी हरकत नाही . पण नवीन पिढीतील युवकांना मराठा सेवा संघ वा तत्सम संस्थांमध्ये पाठवून हक्काचे स्थान मिळवून दिले पाहिजे अशी अपेक्षा आहे. दुर्दैवाने असे लक्षात आले आहे की काही लोक चळवळीतील काही कार्यकर्ते सुद्धा काही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्या मुलांना सेल्फ सेंटर्ड बनविण्यासाठी टिप्स देत असतात . मुलांचे भवितव्य स्वत: ठरवतात . किंवा आपल्या आयुष्यातील अर्धवट स्वप्न मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असतात . हे खूपच डेंजरस आहे . यामुळे मुले-मुली नैराश्याचे धनी होतात .. मित्रांनो , शेवटी निरिक्षणातून आढळलेल्या काही बाबी मांडून थांबतो ….(१) कृपया मुलांशी खेळीमेळीने व बरोबरीने वागा . आपली मुले-मुली आपली कार्बन कॉपी बनवू नका .(२) आपली मुले-मुली आपल्या पेक्षा चतुर , चाणाक्ष , हुशार व बुध्दीमान असतात यावर विश्वास ठेवा .(३) घराबाहेरील समस्या घरात आणू नका . तसेच घरातील समस्या बाहेर सोबत घेऊन जाऊ नका . जय गरजेचे असले तर कौटुंबिक पातळीवर सामुदायिक चर्चा करून निर्णय घ्यावा .(४) विनाकारण अवेळी घराबाहेर फिरत राहू नका .(५) निसर्गाने जे काही दिले आहे त्या शरिरावर प्रेम करा . चिडचिड , वैताग , भांडखोर वृत्ती नसावी . हसरे रहावे . आनंदी रहावे . (६) कोणत्याही चांगल्या क्वालिटीच्या जीवनाचा अंगीकार करावा . आणि चूकुनही वाईट असामाजिक बाबींचा विचार मनात आणू नये . (७) सकस स्पर्धा जरुर करा . पण द्वेषातून कोणाकडे पाहू नका .(८) नियमितपणे अपडेट रहावे . मुलांना अपडेट करावे . (९) चांगले छंद , संवयी , आवडी जतनासाठी खास प्रयत्न करावेत . (१०) विनाकारण दररोजच्या जीवनात नियमितपणे नवनवीन व अनोळखी व्यक्तींना वा कुटुंबियांना भेटत राहून आपले सामाजिक साम्राज्य विस्तारित करण्यात आनंद झाला पाहिजे .