Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / आदिवासी बांधवांची दिवाळी ” वाघ-बारस “

आदिवासी बांधवांची दिवाळी ” वाघ-बारस “

मंगेश मेश्राम – नागपूर 

भारतात सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते,या दिपोत्सावासाठी आदिवासी बहुल भागात लगबग पहायला मिळते.प्रत्येक समाज पांरपारिक पद्धतीने दिवाळी उत्सव साजरी करीत असतो. 

” वाघबारस ” पूजनाला आदिवासी समाजामध्ये दीपावली उत्सव म्हटल्या जाते आदिवासी बांधवाची दिवाळी वाघदेवतेच्या पूजनाने सुरु होते. आदिवासी समाजात वाघदेवतेचे स्थान खूपच महत्वाचे आहे, वाघबारशीच्या निमित्ताने गाव-सीमेवर वाघदेवतेची पूजा-अर्चा केली जाते.

निसर्गाचे आदिवासी समाजाच्या जीवनात खूपच  महत्व आहे. निसर्ग हाच देव असून संपूर्ण मानव जातीचा तारणहार आहे अशी भावना प्रत्येक आदिवासी उराशी बाळगून असतो.

शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून आदिवासी समाज हा पूर्वापार शेतीच  करीत आलेला आहे. त्यामुळे जल- जंगल-जमीन ह्या सोबत मैत्री करून आदिवासी समाज पिढयापिढ्या जगत आलेला आहे. कृषी सदैव आदिवासी समाजाकरिता पुज्य आहे.

आदिवासी बांधव वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करतात. ते हा सण पांरपारिक पद्धतीने साजरा करून सर्व आदिवासी समाजाला संघटित ठेवण्या करिता दिवाळ सणाचा उपयोग करतात आणि निसर्ग पूजन करून एका प्रकारे जगाला आपणही निसर्गाचं देणं लागतो ह्याची जाणीव करून देत असतात.आणि भरभरून देणाऱ्या निसर्गाला एकप्रकारे धन्यवाद देत असतात. 

झाडे – पशु -पक्षी, शेतीमध्ये पिकणारे धन-धान्य,इत्यादीं नैसर्गिक वारश्याला आदिवासी बांधव खरी संपत्ती मानीत असतो म्हणूनच त्यांच्या दृष्टीने कृषी-गोधन-निसर्ग पूजन हेच आदर्श लक्ष्मी पूजन ठरते. कारण निसर्गाने दिलेले निसर्गालाच अर्पण करावयाचे आहे ह्यावर प्रत्येक आदिवासीचा ठाम विश्वास आहे.आणि हेच तत्व पदोपदी पाळीत असतो

दिवाळीची सुरुवात वाघबरस या सणाने पारंपारिक पद्धतीने गोधन पूजनाने करतात. गोधन जंगलात चरावयास गेल्यानंतर उपवास पडकून प्रत्येक गाव-कुसावर बारस पूजन करण्यात येते, या प्रसंगी आबाल-वृद्धांसह गाव-कुसाजवळ गोळा होऊन, घरोघरी मागून आणलेली ‘इरा’ म्हणजेच शेरभर तांदूळ गोळा करण्यात येतो. वाघबारस करिता कोंबडीचा बळी वाघदेवाला चढवून पूजा केली जाते. पूजनाकरिता सावरीचा खांब गाय दांडावर उभा केला जातो आणि हि जागा गाईच्या शेणाने व्यवस्थित सडा-संमार्जन करून त्या जागेवर तांदळाच्या पुंजक्या पाडल्या जातात. वाघदेवाच्या मूर्तीवर, चंद्र, सूर्य, वाघदेव, नागदेव, मोर यांची चित्रे कोरलेली असतात मग शेंदूर चढवून पूजा केली जाते. त्यावर धान्याची कणसे नागली, भात, उडीद वाहिले जाते, जंगलातील रानभूत, डोंगऱ्यादेव, निळादेव, पाणीदेव, हिरवा देव, कणसरा, रानवा, गावदेवी, गाय या सर्व ज्ञात, अज्ञात देव- देवता, भूत-खेत या सर्वांना विधिवत पूजले जाऊन मग गावातीलच भगत वाघदेवतेला साकडं घालतो, 

तो विनवणी करतो कि ” हे वाघ देवा तुझ्याच कृपेनं आमचं गोधन म्हणजे साक्षात आमच्या लक्ष्मीच तू रानावनात – निसर्गात रक्षण करीत आला आहेस तसेच यापुढे सुद्धा तुझी कृपादृष्टी राहू दे ‘ अशी श्रद्धा साद वाघदेवाला, नागदेव, मोर, सूर्य, चंद्र इत्यादींना म्हणजेच निसर्गाला घातल्या जाते. पूजनाच्या ठिकाणी कोंबडीचे जिवंत पिल्लू किंवा अंडे ठेवले जाते नंतर ढोल वाजवून, गाय-गुरांचा कळप पळविला जातो ज्यामुळे गुरांच्या पायाखाली अंडे किवा कोंबडीचे पिल्लू तुडविले जाऊन बळी प्रथा पूर्ण होते. 

या नंतर सुरु होते गुराख्यांची परीक्षा. कारण तो जंगलामध्ये गोधनासोबत सतत वावरत असतो. त्याच्या परीक्षेकरिता भात – कुटाराला आग लावली जाते. त्या आगीच्या ज्वालामधून गुराख्याला धावत पळत जावे लागते.ह्या मागे एकच शुद्ध हेतू असतो कि दुर्दैवाने जंगलात बाका प्रसंग उद्भवला तर गुराख्याने आपल्या लक्ष्मीला म्हणजेच गोधनाला वाघाच्या तावडीतून, जंगलातल्या अकस्मात आगीतून, पुरापासून अथवा चोरांपासून आपल्या गुरांची सुखरूप सुटका करता यावी, यामध्ये सुधारणा, सूचना इत्यादी केली जाते. त्यानंतर गावातून गोळा करून आणलेल्या इरा चे सामूहिक भोजन केले जाते. एकंदरच हा सर्व थाट निसर्ग पूजनाचा असतो. आदिवासी समाजाने या पूजनाला वाघबरस असे नाव दिलेले आहे. ज्या द्वारे वाघ देवतेला नमन केल्या जाते. 

वाघबारशीच्या दिवसापासून ते लक्ष्मी पूजनापर्यंत आदिवासी गुराखी बांधव दररोज रात्री आजूबाजूच्या गावांमधून वाघ-गाय- नागदेवता इत्यादींची गाणी गाऊन गोधनाच्या नावाने धिंडवाळी मागतात. धिंडवाळी मागणाऱ्याला आदिवासी महिला ओवाळतात. ज्योत जळण्याकरिता तेल देतात. त्याचबरोबर सुपात नागली, भात नैवेद्य म्हणून तर दक्षिणा म्हणून मोठ्या प्रमाणात इरा दिले जाते. घर आणि गाईचा गोठा सडा-संमार्जनाने तसेच गोमुत्राने पवित्र केला जातो जेणेकरून दिवाळीच्या पाच दिवसात गायीच्या रूपाने कायमस्वरूपी लक्ष्मी घरात येते असे प्रत्येक आदिवासी बांधव मानतो. 

 आदिवासी हेच खरे पर्यावरणाचे व निसर्गाचे रक्षणकर्ते आहे हे सत्य पटते. दिवाळी सण सुद्धा निसर्गाला म्हणजेच देवाला अर्पण करण्याच्या या परंपरेवरून आदिवासी समाज जगाला एक मोलाचा संदेश देतो. 

महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी याप्रसंगी सांगतात कि ” आदिवासी समाज हा आपली परंपरा निष्ठेने जपतो. आदिवासीं उत्सव -सण साजरे करतांना आपल्या आदिम संस्कृतीचा सन्मान राखतात,शिक्षण-तंत्रझान इत्यादी क्षेत्रात आश्वासक वाटचाल करतानाच निसर्ग तसेच पर्यावरणाचा आब राखत हा समाज जगताला वसुंधरेच्या रक्षणाचा आणि संवर्धनाचा जणू संदेशच पेरीत असतो “

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *