यवतमाळ : महाराष्ट्रातील अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. असे लेखी आश्वासन प्राप्त झाल्यामुळे टिपेश्वर अभयारण्य येथे सुरु असलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तसेच शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यासह राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्प येथील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी तसेच गाईड यांची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी अभयारण्याचे पर्यटन त्वरीत सुरु करावे अशी आग्रही मागणी शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता टिपेश्वर अभयारण्य च्या गेट समोर सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले. जीप्सी चालक, गाईड तसेच किशोर तिवारी यांनी थेट टिपेश्वर अभयारण्याच्या गेट समोरच ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. आपल्या मागण्या पुर्ण कराव्या यासाठी आंदोलन करणा-यांनी घोषणाबाजी केली. काही अघटीत घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान वन सचिव तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वन सचिव यांनी काही अटींच्या आधारावर दोन दिवसात अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याचे आश्वासन दिले. याव्यतिरीक्त पर्यटन सुरु करण्यात येणार असल्याचे पत्र सुध्दा पांढरकवडा डीएफओ यांनी दिल्यामुळे आजचे सुरु असलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली. या आंदोलनात सुन्ना ग्रामपंचायतचे उपसरपंच पवन चिंताकुंटलावार, जिप्सी चालक प्रवीण बोरकुंटवार, शाहरुख खान, पांढरकवडा चे माजी नगरसेवक अंकित नैताम, सतीश जिद्देवार, मंगेश मैदपवार, प्रवीण बोळकुटवार, रिजवान शेख, शंकर मरसकोल्हे, राजू मरसकोल्हे, साहिल शेख, सलमान खान, योगेश ठोंबरे, जावेद शेख, अश्विन बाकमवार, गजानन जिद्देवार, नागेश्वर मेश्राम, सेनु आत्राम, चंदू मडावी, कृष्णा आडे, नरेंद्र गेडाम, तोफिक शेख, श्रीकांत गद्दमवार, सागर मडावी, प्रशांत मार्तावार, आकाश बावणे, सुहास शिरपुरकर, महेंद्र आत्राम, सुरज सीडाम, निलेश गड्डमवार, सदानंद मोरे यांच्यासह अनेक जीप्सीचालक, गाईड सहभागी झाले होते.
अन्यायाच्या विरोधात आंदोलन
मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प सुरु असताना ताडोबा, टिपेश्वर तसेच इतर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद का ? असा प्रश्न किशोर तिवारी यांनी सरकारला केला होता. राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्या जातो त्याचवेळी राज्यात अटी शर्ती ठेऊन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन का सुरु करण्यात येत नाही असा प्रश्न सुध्दा तिवारी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन वर्षापासून टिपेश्वर चे अभयारण्य बंद, चालु करण्यात येत असल्यामुळे जिप्सी चालक तसेच गाईड्स यांच्या वर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळेच न्यायासाठी आंदोलन करण्यात आले.