चिखली : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच एक अति उत्साहजनक तसेच भावनिक वातावरण निर्माण झाले आहे असे लक्षात येते . अर्थातच ही एक अभिमानास्पद बाब आहे . ” एकच वारी , एकोणीस फेब्रुवारी ” व ” शिवराय मनामनात , शिवजयंती घराघरात ” , हे नारे जगभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची लाट निर्माण करण्यासाठी यशस्वी होत आहेत . महत्वाचे म्हणजे एकेकाळी भारतीय हिंदू धर्मातील तिथी की जगभरातील सामाईक काल गणनेसाठी वापरात असलेल्या इंग्रजी कॅलेंडर नुसार तारीख ?? हा शिवजयंती वाद निर्माण करण्यात आला होता . याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव फक्त महाराष्ट्रातच कमीत कमी तीन वेळा साजरा केला जात असे . एवढेच नाही तर यातून शिवप्रेमी जनतेत गट निर्माण केले गेले . तसेच धार्मिक व जातीय वातावरण गरम करण्यात आले होते . शिवजयंतीच्या दिवशी राज्यभर तणाव असायचा . महाराष्ट्र राज्याबाहेर अपवादानेच शिव जयंती साजरी केली जात होती . आता एकोणीस फेब्रुवारी रोजी देशभरात व देशाबाहेर सर्वच ठिकाणी शिवजयंती साजरी केली जात आहे . परिणामी सामाजिक एकता व बंधुभाव निर्माण झाला आहे . सर्वांनाच शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा .
यापूर्वी वर्षोनुवर्षे किल्ले शिवनेरी वर तसेच महाराष्ट्रातील गावोगावी वैशाख शुद्ध द्वितीया व फाल्गुन वद्य तृतीया ह्या हिंदू तिथीनुसार , तर काही ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साध्या पध्दतीनेच साजरी केली जात होती . सुमारे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळात शिवजयंती निश्चित तिथी वा तारीख बाबतीत एकमत झाले नाही . आज शिवजयंती २०२२ सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे . याबद्दल खूप खूप आनंद होत आहे . सर्वच शिवप्रेमी जनतेचे आभार . भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही अमृतमय घटना आहे . अभिनंदन व शुभेच्छा .
मित्रांनो , हा एक आनंदोत्सव साजरा करत असताना आपल्याला शिवजयंती तारखेच्या बाबतीत काही माहिती व इतिहास माहित असणेही गरजेचे आहे असे मला वाटते . ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे असे लक्षात येते की सन १८६९ मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव किल्ले रायगड व नंतर पुणे शहरात सर्वप्रथम सुरू केला होता . पुढच्या काळात बाळ गंगाधर टिळक यांनी सन १८९५ मध्ये वेगळा शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली . त्यावेळी लोक वैशाख शुद्ध द्वितीया ह्या तिथी नुसार शिवजयंती साजरी करत असावेत . टिळक यांच्या छावणीत परशुराम व बाजीराव पेशवे यांचे चित्र ठेवून शिवजयंती साजरी केली जात होती . इतरांनी हरकत घेतली असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका मुस्लीम सहकाऱ्याचे एक चित्र महाराजांचे चित्र म्हणून ठेवले होते असे म्हणतात . याच काळात पुणे येथे ब्राह्मणेतर विरूद्ध ब्राह्मण वाद , छत्रपती मेळे विरुद्ध टिळक मेळे वाद विकोपाला गेले होते .
वैशाख शुद्ध द्वितीया १५४९ ( सहा एप्रिल १६२७ ) की फाल्गुन वद्य तृतीया १५५१ ( एकोणीस फेब्रुवारी १६३०) हा वाद निर्माण झाला होता . हे दोन्ही गट वैशाखी व फाल्गुनी गट नावाने ओळखले जात होते . यावरून शिवप्रेमी जनतेने समजून घेणे गरजेचे आहे की , शिवजयंती वाद हिंदू मराठी पंचांग महिना व तिथीचा आणि इंग्रजी तारीख एवढाच नव्हता . तर हिंदू तिथी व महिनाही एक नव्हते . तिथीला विरोध नव्हता . यात सुमारे दोन वर्षांचा फरक होता . या व अन्य कारणाने शिवजयंती साजरी करणे सुमारे १८९९ पासूनच कमी होत गेले . १९२० नंतर किल्ले शिवनेरी वर रामचंद्र बुट्टे पाटील जून्नर व अन्य मंडळे फाल्गुन वद्य तृतीया नुसार शिवजयंती साजरी करत असत . तीन मे १९२७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बदलापूर कोकण येथे भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी केली होती . अशा प्रकारे वेगवेगळ्या तिथी व तारखांना शिवजयंती साजरी केली जाऊ लागली . पण शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख बाबतीत मौन पाळले गेले होते . या कारणाने शिव जन्म तारीख निश्चित करण्यासाठी इतिहासकार व शासन कामी लागले .
महाराष्ट्र शासनाने डॉ.पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती . समितीचे फाल्गुन वद्य तृतीया बद्दल एकमत झाले होते . परंतू परंपरावादी समाजाच्या दबावामुळे त्यांनी वैशाख शुद्ध द्वितीया हीच तिथी चालू ठेवण्याची शिफारस केली होती . मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही याच तिथीला किल्ले शिवनेरी वर शिवजयंतीच्या निमित्ताने १९९५ पासून वंदन करण्यासाठी जमत होतो . शिव जन्म तारीख निश्चित व्हावी हीच शिवप्रेमी जनतेची अपेक्षा होती . मराठा सेवा संघाचे इतिहासकार कामाला लागले . जगप्रसिद्ध इतिहासकार वा. सि . बेंद्रे यांनी सविस्तर संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म किल्ले शिवनेरी वर दिनांक एकोणीस फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता . असे सप्रमाण सिद्ध केले आहे . त्यासाठी अनेक वर्षे परदेशातील मूळ कागदपत्रे तपासले होते . एवढेच नाही तर शहाजी महाराज , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र लिहून मराठेशाहीचा इतिहास बारकाईने मांडला आहे . सन १९३३ मध्ये इटलीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्सल चित्र मिळवले व प्रकाशित केले होते . आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे चित्र पाहतो ते महान इतिहासकार वा. सि . बेंद्रे यांनीच मिळवलेले आहे .
अशा सर्वश्रेष्ठ इतिहासकारांच्या संशोधनाचा आधार घेत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारी १९९७ रोजी सर्वप्रथम आम्ही किल्ले शिवनेरी वर मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली होती . पुढे तीच प्रथा चालू ठेवली . त्यावेळी आम्ही किल्ले शिवनेरी वरील नगारखाना मधील एका खोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसविला होता . कारण शिवजन्म झालेल्या मूळ वाड्याचा तेवढाच भाग आज शिल्लक आहे . तर स्थानिक पोलीस सलग चार वर्षे आम्ही बसवत असलेला पुतळा जप्त करत होते . याशिवाय राज्यभरात दरवर्षी मराठा सेवा संघ १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करत आहे . याला काही विरोध झाला होता . पण आम्ही थांबलो नाही . आज आम्हाला आनंद आहे की जगभरातील शिवप्रेमी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करत आहेत .
पुढे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख एकोणीस फेब्रुवारी १६३० हीच निश्चित करण्यासाठी मागणी केली . तेवीस एप्रिल १९९९ रोजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधानसभेत एका ठरावाद्वारे हीच मागणी केली होती . सुमारे डझनभर आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता . त्यानुसारच मुख्यमंत्री प्राचार्य मनोहर जोशी यांनी सांस्कृतीक कार्य मंत्री प्रा प्रमोद नवलकर यांच्या सोबत सल्लामसलत करून मागणी मान्य असल्याचे जाहीर केले . परंतू नंतर आलेल्या मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व हिंदुत्वाचे कारण सांगून तसे आदेश निर्गमित करण्यास नकार दिला होता . १९९९ मध्ये स्मृतीशेष विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर प्रा रामकृष्ण मोरे सांस्कृतिक कार्य मंत्री झाले . जानेवारी २००० मधील नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मी , आमदार रेखाताई खेडेकर व मंत्री रोहिदास पाटील यांनी प्रा रामकृष्ण मोरे यांची भेट घेऊन शिवजयंती तारीख एकोणीस फेब्रुवारी जाहीर करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी केली . परंतू प्रा रामकृष्ण मोरे जरा द्विधा मनःस्थितीत व अस्वस्थ होते . शिवसेना आंदोलन करून दंगली घडवून आणतील अशी त्यांना भिती वाटत होती . शेवटी आम्ही सर्वजण मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कडे गेलो . पुन्हा भरपूर चर्चा झाली . रोहिदास पाटील अक्षरशः ओरडले …..
आणि विलासराव देशमुख यांनी आदेश निर्गमित करण्याची मान्यता दिली . आम्ही मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रा रामकृष्ण मोरे यांना यावर्षी शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी वर शासनाने साजरी करावी अशी मागणी केली . सर्वांनीच ती मान्य केली .
नागपूर येथील चर्चा बाबतीत मंत्रालय , मुंबई येथे कळविण्यात आले . आणि पंधरा फेब्रुवारी २००० रोजी मंत्रालयीन आदेश निर्गमित केले गेले . त्यावेळी मी ठाणे येथे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होतो . सतरा फेब्रुवारी २००० रोजी रात्री आम्ही बारा सहकारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा , लोखंडी गेट , सजावटीसाठी सामान घेऊन रात्री किल्ले शिवनेरी वर पोहोचलो . तेथील नगारखाना मधील खोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापित केला . सजावट केली . रांगोळी काढली . एक पाळणा बांधला . ॲड . राजेंद्र बुट्टे पाटील व त्यांच्या कुटुंबातील महिलांना दुसऱ्या दिवशी शिवनेरी वर नेले . पाळणा गाऊन घेतला . दिवसभर इतर तयारी केली . पुरातत्त्व विभागाने आमच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली . पोलिस निरीक्षक शेख पाहण्यासाठी आले . आमच्या सोबत पोलीस अधिकारी भाल साहेब होते . पोलीसांना सर्व माहिती दिली व समजावून सांगितले . शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी उचलली . एकोणीस फेब्रुवारी २००० रोजी सकाळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सहकारी मंत्री हेलीकॉप्टरने आले . मी व आमदार बाळासाहेब दांगट सामोरे गेलो . आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख व इतर मंत्री यांना घेऊन सरळ नगारखाना गाठला . महिलांनी स्वागत केले . मुख्यमंत्री व सहकारी मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमास अभिवादन केले . पुजन केले . जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी पाळणा गायला . ओळखी झाल्या .
तेथून मुख्यमंत्री जिजाऊ व बालशिवाजी समुह शिल्प दर्शनासाठी आले . आणि नंतर मराठा सेवा संघाच्या मंचावर स्थानापन्न झाले . स्वागत व परिचय झाला . शाहीर रामदास कुरंगळ सिंदखेड राजा यांनी खड्या आवाजात पोवाडा सादर केला . मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदम खुश झाले . शाहीराचे अभिनंदन करुन नगद बक्षिस दिले . पुढे सुमारे दोन तास छान कार्यक्रम झाला नि मुख्यमंत्री आमचे अभिनंदन करुन व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मुंबई कडे परतले …. एकोणीस फेब्रुवारी २००० हीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी वर साजरी झालेली पहिली शिवजयंती होय . ही प्रथा सर्वप्रथम सन १९९५ पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरू झाली होती . यापूर्वी दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व इतर काही पाहूणे हेलीकॉप्टरने सरळ किल्ले शिवनेरी येथे उतरत . जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे व इतर काही अधिकारी स्वागत करत होते . पुढे मुख्यमंत्री जिजाऊ व शिवाजीराजे समुह शिल्पाचे पूजन करून माल्यार्पण करत होते . आणि अगदी अर्धा तासांतच तेथून जून्नर शहरातील जाहीर सभात सहभागी होत असत . मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वप्रथम किल्ले शिवनेरी वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची पद्धत सुरू केली आहे . तीच आज चालू आहे . मराठा सेवा संघाच्या अंतर्गत वादामुळे अलीकडे तेथील सहभाग कमी झाला आहे . ह्या मानपानाच्या बाबी अपरिहार्य असतात . महत्वाचे म्हणजे मराठा सेवा संघाच्या योजनेनुसार शिवजयंती शिव जन्मस्थान किल्ले शिवनेरी येथे भव्य प्रमाणात शासकीय इतमामात साजरी केली जात आहे . हाच खरा मोठा आनंद आहे . पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व आपणास खूप खूप शुभेच्छा . घरोघरी वर्तमानातील शिवाजी तयार होवोत हीच अपेक्षा आहे .
लेखक : शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर चिखली .मोबाईल – संस्थापक अध्यक्ष : मराठा सेवा संघ ९८२३६९३२२७ .