यवतमाळ: महावितरणने थकीत वीजबिल वसूल मोहीमेला अधिक गती दिली आहे. या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होऊ नये व त्यांना सुट्टीच्याही दिवशी आपल्या चालू अथवा थकीत वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे.
महावितरणला आपल्या ग्राहकाच्या वीजेची गरज भागविण्यासाठी दरमहीन्याला विजेचे नियोजन करावे लागते.शिवाय त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करतांना विजेचे बिल नियमीत आणि वेळेवर वसूल होणे गरजेचे असते.परंतू तसे होत नसल्याने महावितरणला वसूली मोहीम राबवावी लागते आणि या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा कट करण्याची कटू कारवाई करावी लागते.
थकीत वीज बिल वसूलीशिवाय गत्यंतर नसल्याने महावितरणकडून वसूलीला जोरदार वेग देण्यात आला आहे.या मोहिमेत वीजबिल न भरणाऱ्यां थकबाकीदार ग्राहकांचा केंव्हाही वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे महावितरणची कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणची वीजबिल भरणा केंद्राचा, तसेच आठवड्यातील चोवीसही तास सुरू असणारे महावितरणच्या मोबाईल एपव्दारे किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळाचा वापर करून ऑनलाईन पध्दतीनेही वीजबिल भरना करण्याची सोय उपलब्ध आहे.