Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : बालमोहन विद्यामंदिराचे दादासाहेब रेगे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्या मते शाळा म्हणजे नुसत्या भिंती नाही तर शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी आहे. या शाळेने मला जो मार्ग दाखविला, त्या मार्गावरुन मी पुढे चाललो असल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बालमोहन विद्यामंदिर यांच्यावतीने 1976 आणि 1977 चे माजी विद्यार्थी अर्थातच मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांचा सत्कार त्यांचे वर्गमित्र मैत्रिणींकडून करण्यात आला. बालमोहन अभिमान सोहळयाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे, अभिनेते अतुल परचुरे, बालमोहनचे विश्वस्त श्री. गुरुप्रसाद रेगे, नाटय दिग्दर्शक अजित भुरे यांच्यासह बालमोहन विद्यामंदिरचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालक आणि मुलांचे नाते शब्दांपलीकडचे

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला अनेक जण आज बाळासाहेब असते तर किंवा आज माँ मीनाताई असत्या तर काय वाटले असते असे विचारतात. पण मला असे वाटते की, प्रत्येक पालक आणि त्यांच्या मुलांमधील नाते हे शब्दांपलीकडचे असते. माझ्या पालकांनी मला घडवले तर बालमोहन विद्यामंदिर सारख्या शाळेने संस्कार दिले. त्यामुळे आज माझे पालक माझ्यासोबत नसले तरी प्रत्येक पावलावर त्यांची आठवण येते आणि ती पुढेही येत राहील.

यावेळी श्री. अजित भुरे यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. शाळेचा पहिला दिवस आठवतो का ? पहिली ते दहावीच्या वर्गशिक्षकांची नावे काय होती, ती आठवतात का ? चित्रकलेत करीअर करावेसे वाटत होते का ? असे प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले की, शाळेचा पहिला दिवस आजही आठवतो कारण पहिल्या दिवशी शाळेत माँनी सोडल्यावर रडण्याशिवाय दुसरे काही केले नव्हते. कामत ताई, वसुंधरा ताई या वर्गशिक्षिकांची नावे आठवतात. शाळा सुटल्यानतंर मैदानावरची मॅच लांबल्याने शाळेत यायला उशीर झाल्याने कामत बाईंनी कसे मारले होते ते सगळे आठवते. शाळेत साजरे होणारे बालदिन, दहीहंडी अशा सर्वांमध्ये मी सहभागी होत असे, मात्र शाळा आणि महाविद्यालयात असताना कधीच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नसल्याचेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपल्याच शाळेत आपल्या शिक्षकांसमोर, आपल्या वर्गमित्रांसमोर आपला सन्मान होणे ही बाब आपल्यासाठी आनंदाची आहे. आज येथील उपस्थित विद्यार्थ्यांना मला मार्गदर्शन करावयाचे नाही कारण आजची मुले हुशार आहेत त्यांना आपला मार्ग कोणता हे आपोआप  कळत जाते.

महाराष्ट्राचे वैभव जगाला  दिमाखाने दाखविणार – मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गड-किल्ले हे आपले वैभव आहेत. त्यांचे संवर्धन जतन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले गड- किल्ले हे निसर्गाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला मिळालेली देण आहे. महाराष्ट्राच्या गड- किल्ल्यांचे वैभव जगाला दिमाखाने दाखविणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बालमोहनचा विद्यार्थी कधीही चूक करणार नाही – जयंत पाटील

बालमोहनच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दादासाहेब रेगे हा अविभाज्य घटक आहेत. दादांमुळे चांगले विचार करण्याची, वाचन करण्याची सवय लागली. दादांच्या संस्कारामुळे इथपर्यंत पोहोचलो असून चुकीच्या मार्गाने कधी जाणार नाही . दादांनी आम्हा विद्यार्थ्यांना संस्काराबरोबरच चांगले वाईट यामधला फरक सांगितला, त्यामुळे आम्ही बालमोहनचे विद्यार्थी असून कधीही चूक करणार नाही. शाळेत असताना मधली सुट्टी मला विशेष प्रिय होती. कारण 30 मिनिटांच्या मधल्या सुट्टीमधले 20 ते 22 मिनिटे क्रिकेट खेळण्यात जायची.त्यामुळे त्या शाळेच्या सुट्टीत खेळलेले क्रिकेट, शाळेच्या पटांगणात खेळलेली लगंडी याची मजा परत कधीच अनुभवली नाही. ग्रामविकास मंत्री म्हणून काम करीत असताना तीन वर्षे महाराष्ट्राला पहिला पुरस्कार मिळाला आणि आताही हे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर असेल असे श्री. जयंत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्री. सुधीर नाईक यांचाही यावेळी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात बालमोहन गीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली. गीतमंचच्या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी 1976 च्या बॅचच्या अमिता देऊस्कर- सामंत यांनी मान्यवरांचे आभार मानले.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *