Breaking News
Home / ॲग्रो संवाद / आदिवासी विकास विभागाच्या वार्षिक परिषदेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विचारमंथन

आदिवासी विकास विभागाच्या वार्षिक परिषदेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विचारमंथन

मुंबई : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून राबवण्यात येणारे विविध प्रकल्पस्तरीय उपक्रम, आश्रमशाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी करावे लागणारे प्रयत्न, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांसाठी भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना अशा विविध शिक्षणविषयक मुद्दयांवर आदिवासी विकास विभागाची तीन दिवसीय वार्षिक परिषद नाशिक येथे सोमवारी संपन्न झाली.

प्रकल्पस्तरावर राबवण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रमांची जलद गतीने अंमलबाजावणी करता यावी तसेच प्रकल्प स्तरावरील समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आयोजित केलेल्या वार्षिक परिषदेचा समारोप शैक्षणिक सुधारणा आणि उपाययोजनांच्या सविस्तर चर्चेने करण्यात आला.

आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, उपसचिव सुबाराव शिंदे, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त नंदिनी आवडे,  नाशिक अपर आयुक्त गिरीश सरोदे, नागपुर अपर आयुक्त संदीप राठोड, अमरावती अपर आयुक्त विनोद पाटील आणि ठाणे अपर आयुक्त संजय मीना आणि आदिवासी प्रकल्प अधिकार्‍यांच्या उपस्थितीत वार्षिक परिषदेचा शेवटचा दिवस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पार पडला.

शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे दैनंदिन वेळापत्रक, वसतिगृह नियमावली, शिक्षकांची भूमिका, अभ्यासाव्यतिरिक्त नाविन्यपूर्ण उपक्रम, आश्रमशाळांसाठी आवश्यक सोईसुविधा याची इत्यंभूत माहिती असलेल्या आश्रमशाळा सुधारित संहितेविषयी नाशिक अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी माहिती दिली. शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांसाठी आचारसंहिता तयार करणारे महाराष्ट्र हे भारतातील सर्वप्रथम राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

आश्रमशाळा व्यवस्थापन, गुणवत्ता व्यवस्थापन, संनियंत्रण व्यवस्थापन, प्रशासकीय बाबी अशा भागात आश्रमशाळा आचारसंहिता तयार करण्यात आली असून त्यानुसार कार्यवाही केल्यास भविष्यात निश्चितच आश्रमशाळांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, अशी चर्चा करण्यात आली. या परिषदेच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्रात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपाययोजनांविषयी प्रकल्प अधिकारी, सल्लागार आणि शिक्षण विषयात आदिवासी विकास विभागाशी जोडलेल्या काही संस्थांनी आपले विचार मांडले. मागील पाच वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सरासरी निकाल सादर करत भविष्यात जलद गतीने प्रगती साधण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांची व्याप्ती समजून घेण्यात आली. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवणऱ्या शिक्षकांना अनोख्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्याचे मत उपस्थितांनी मांडले.

या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या विविध जिल्ह्यांच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले. यात कळवण प्रकल्प अधिकारी पंकज आशिया यांनी आश्रमशाळा शैक्षणिक गुणवततेसाठी राबवलेल्या समर्थ अभियानाची माहिती दिली. इ- लर्निंग, शिक्षकांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू केलेले बायोमेट्रिक हजेरी, आश्रमशाळेतच सुरू केलेला विद्यार्थ्यांचा गृहपाठ यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ दिसू लागल्याचे पंकज आशिया यांनी सांगितले.

भामरागड प्रकल्प अधिकारी मनोज जिंदाल यांनी आश्रमशाळेत ग्रंथालय, वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती तसेच खेळ यातील प्रगतीसाठी राबवलेला ‘तेजस्वी शिक्षक कार्यक्रम’ याविषयी माहिती दिली. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असल्यास सर्वात प्रथम शिकवण्याची पद्धत विकसित करायला हवी. शिक्षकांची शैक्षणिक क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक दहा आश्रमशाळांचे ‘शिक्षक अभ्यास वर्ग’ तयार करणे आवश्यक आहे, असे  अजीम प्रेमजी फाऊंडेशनचे अनंत गंगोला यांनी सांगितले.

प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी आश्रमशाळेतील चांगले काम करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तसेच प्रयोग करण्यास न घाबरता शिक्षक, विद्यार्थ्यांना संधी देऊन शैक्षणिक व्यवस्था भक्कम करता येईल असे मार्गदर्शन त्यांनी केले. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी कराडीपथ, एकलव्य विज्ञान प्रकल्प यांनी सादरीकरण केल्यावर आश्रमशाळेत इंग्रजी आणि विज्ञान आकलनाची प्रगती पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

About Editor Desk

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *