Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी कृषीकर्ज खात्याची तातडीने नोंदणी करावी – जिल्हाधिकारी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी कृषीकर्ज खात्याची तातडीने नोंदणी करावी – जिल्हाधिकारी

अमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही माहिती सात फेब्रुवारीपर्यंत पूर्णत: भरण्यात यावी, तसेच यात काही अडचणी येत असल्यास याबाबत जिल्हा प्रशासनास अवगत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया, तसेच या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी बँकेच्या प्रतिनिधीकडून जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरू शकतील अशा खातेदाराची बँकनिहाय माहिती घेतली. काही बँका एकत्रितपणे नागपूर किंवा मुंबई येथून शेतकऱ्यांची नावे नोंदणी करीत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील किती खातेदारांची नावे नोंदणी करण्यात आली, याची माहिती कळविण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांची माहिती नोंदविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत कालावधी असला तरी सात फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावे. नावे पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी येत असलेल्या अडचणी जिल्हा प्रशासनास सांगाव्यात. या समस्या शासनास कळविण्यात येतील.

            कर्जदार शेतकरी स्वत:हून बँकांना माहिती देत आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित भरावी, यातून कोणताही पात्र लाभार्थी सुटू नये, याची खबरदारी बँकांनी घ्यावी. शेतकरी पात्र असून त्यांची नोंदणी झाली नसल्याचे प्रकार समोर आल्यास, अशा प्रकरणी बँकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या अडचणी बँकस्तरावर सोडविणे शक्य आहे, अशा सर्व समस्या त्याच ठिकाणी सोडवाव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *