Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / वातावरण बदल आणि आपण

वातावरण बदल आणि आपण

लेखक
 राजकुमार कोठीकर – -डॉ. व्ही .एस. खवले – डॉ. पी. सी . पगार – पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ -नागपूर  

चार स्वतंत्र परिस्थितींच्या आधारावर वातावरणातील बदलांचे भविष्यकालीन आकलन अवलंबून असते. संशोधनाच्या साहाय्याने परिणामांचे अंदाज बांधले जाऊ शकतात. संपूर्ण जगात वातावरण बदलांविषायीचे महत्त्वाचे संशोधन एका व्यासपीठावर आणण्यासाठी व सर्वसाधारण जनजागृती निर्माण करण्यासाठी वातावरण बदलासंदर्भात आंतरशासकीय समूहा (इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) ची स्थापना करण्यात आली आहे. विकसनशील तसेच अविकसित देशांमध्ये वारावरण बदलांचे सर्वाधीक दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या वातावरण बदलांची गती कमी करण्याच्या प्रयत्नांबरोबरच त्यांचा सामना करण्याची पूर्वतयारी व पूर्वनियोजन करण्याची गरज आहे.

पर्यावरणातील हरीतगृहवायूंचे वाढते प्रमाण हेच जागतिक तापमानवाढीचे मूळ कारण असल्याचे मानले जाते. वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आणि त्याचे दुष्परिणाम कमीत कमी राखण्यासाठी संशोधन प्रकल्प राबवले जात आहेत. वातावरणातील बदल जागतिक पातळीवर आपला परिणाम दाखवत असल्यामुळे त्याचा सामना करण्याची पूर्वतयारी व व्यासपीठही जागतिक पातळीवरीलच असण्याची गरज भासते. काही विकसित देशांचा पुढाकार आणि विकसनशील देशांच्या सहकार्याने जागतिक हवामानशास्त्र संस्था आणि संयुक्त विद्यमाने १९८८ साली वातावरण बदलासंदर्भातील आंतरशासकीय समूहा (आयपीसीसी) ची स्थापना झाली. सध्या आयपीसीसीचे व्यवस्थापन जिनिव्हातील जागतिक हवामानशास्त्र संस्थेमार्फत केले जाते. यामध्ये १९४ देशांचा समावेश आहे.

आयपीसीसीचे तीन कार्यकारी गट स्थापन करण्यात आले आहेत. पहिला गट भौतिकशास्त्रावर आधारित वातावरणातील बदलांचा अभ्यास व विश्लेषण करतो. दुसरा गट वातावरण बदलांच्या परिणामांचा अभ्यास करतो, तर तिसरा गट वातावरणातील बदलांच्या दुष्परिणामांपासून दूर राहण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे काम करतो. याशिवाय आणखी एक गट कार्यरत असून तो राष्ट्रीय पातळीवर हरीतगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण तपासण्याचे काम करतो.

आयपीसीसी ही काही संशोधन संस्था नाही. ही संस्था आकडेवारी गोळा करण्याचेही काम करत नाही. ही संस्था जगभर कार्यरत आहे. हजारो संशोधकांनी स्वेच्छेने केलेल्या कामाचे समीक्षण व संकलन करून जागतिक व्यासपीठावर मांडण्याचे काम ही संस्था करते.   

आयपीसीसीच्या कामांमध्ये सक्रीय पुढाकार घेऊन आपले देशहिताचे मुद्दे प्रभावी पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे काम भारताने सुरवातीपासूनच केले आहे. हरीतगृह वायूंचे वाढते प्रमाण हेच वातावरण बदलांसाठी जबाबदार आहे. हे एकदा मान्य केल्यानंतर या वाढत्या प्रमाणासाठी जबाबदार घटकही निश्चित होणे अत्यावश्यक ठरते.

वातावरणातील बदल ही समस्या जागतिक समस्या म्हणून पुढे आली असल्यामुळे त्यावरील उपायही सर्वांनी मिळून करायला हवेत. जर आपल्या देशातील औद्योगीकरणाचा वेग कमी न करता तंत्रज्ञान विकासाद्वारे हरीतगृहवायूंचे उत्सर्जन कमी करता येत असेल तर या दिशेनेही प्रयत्न होणे गरजेचे आहे. आयपीसीसीच्या धर्तीवरच आपल्याकडे वातावरण बदलांच्या विविध पैलूंवरही संशोधन चालू आहे.

भारतीय तत्रंज्ञान संस्था (आयआयटी), विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (सेंटर फोर सायन्स अॅन्ड एन्हायनमेंट), भूमी विज्ञान केंद्र (सेंटर फॉर अर्थ सायन्स), भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र केंद्र (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) यांसारख्या संस्था हवामानविषयक उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण, हवामानाचा भविष्यकालीन अंदाज, ग्लोबल सर्क्युलेशन मॉंडेलच्या आकडेवारीची प्रादेशिक पातळीवर अद्ययावत आकडेवारी उपलब्ध करून देण्यासारख्या बाबींवर संशोधन सुरु आहे. वातावरणातील बदलांचा शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रांवर थेट परिणाम होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन भारतीय कृषि संशोधन परिषद वातावरणातील बदल याविषयी एक समूह प्रकल्प राबवत आहे. या नेटवर्कला देशभरातील संस्था  संलग्न आहेत. या प्रकल्पामध्ये शेती, पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन या व्यवसायांवर वातावरण बदलांचे काय परिमाण होतील याचे नैसर्गिक तसेच कृत्रिम वातावरणातील अभ्यास, हवामानाच्या उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण, भविष्याबद्दलच्या आकडेवारीचे विश्लेषण करून त्यासाठीचा अभ्यास आणि त्याचे दुष्परिणाम कमीतकमी ठेवण्यासाठीचे उपाय यावर संशोधन या संस्थांमध्ये चालू आहे.

आतापर्यंत वातावरण बदलासंदर्भात झालेल्या संशोधनाची निवडक निष्कर्ष

  • हिमालायामधील गंगोत्री ग्लेसियर्स १९५४ ते १९७१ या दरम्यान सर्वाधिक वेगाने घटली.
  • लाहौल स्पिनी ग्लेसियर्स १९६३ ते २००६ दरम्यान ८६२ मीटर मागे सरकले.
  • २००५ हे वर्ष जगाच्या इतिहासातील सर्वाधिक तप्त वर्ष ठरले.
  • उत्तर भारतामध्ये गेल्या ५० वर्षातील किमान तापमान १ अंश सेल्सिअसने वाढ.
  • सिन्हा व इतर यांचा १९९८ चा अहवाल : उत्तर भारतातील गहू उत्पादक प्रदेशातील तापमान २.३ ते ४.५ अंश सेल्सिअसने वाढले.
  • मागील काही वर्षामध्ये छत्तीसगढमध्ये मे-जून महिन्यात पाऊस कमी झाल्याने तांदळाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम.
  • रुपकुमार अहवाल / प्रकाशन : संपूर्ण देशामधील सरासरी तापमानात १९०१ ते २००३ या दरम्यान ०.०५ अंश सेल्सिअसने वाढ. मात्र १९७३ ते २००३ या दरम्यान ही तापमानवाढ ०.२२ अंश सेल्सियस (अंदाजे ४.५ पट जास्त)
  • ईशान्य भारत, ओरिसा, पूर्व मध्यप्रदेश, कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी, हरियाणा, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये सर्वाधिक वेगाने तापमानवाढ
  • दक्षिण भारतातील काही क्षेत्र, मध्य भारत तसेच ईशान्य भारतामध्ये मागील काही दशकांमध्ये पावसाचे प्रमाण कमी.
  • गुजरात, महाराष्ट्र तसेच आंधप्रदेशच्या किनारपट्टी भागात पावसाचे प्रमाण जास्त.
  • वाढत्या तापमानामुळे हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादनात घट.
  • बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात या राज्यांच्या किमान तापमानात व पावसाच्या प्रमाणात वाढ, तर कमाल तापमानात घट.
  • उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सूनच्या तसेच सरासरी पावसाच्या प्रमाणात घट.
  • पंजाबमध्ये मागील तीन दशकांमध्ये किमान तापमानात वार्षिक वाढ, त्याचबरोबर वार्षिक व मान्सूनच्या पावसाच्या प्रमाणात वाढ.

वातावरणाचे भविष्यातील अंदाजविषयक संशोधन

  • मध्यभारतामध्ये २०५० पर्यंत रब्बी हंगामध्ये १० ते २० टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता.
  • पश्चिम भारतामध्ये अर्धवाळवंटी भागामध्ये अधिक परंतु अनपेक्षित पावसाचे प्रमाण.
  • पूर्व भारतामध्ये गहू उत्पादनात तापमानवाढीमुळे ५० ते ८० टक्के घट.
  • गहू उत्पादनाच्या अपारंपरिक क्षेत्रात कोरडवाहू भागातील उत्पादन अत्यंत नगण्य होण्याची शक्यता तर अनेक रब्बी पिकांच्या उत्पादनात घट.
  • शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात अनेक प्रयत्नानंतरही ९ ते २५ टक्के घट.
  • राजस्थानमध्ये तापमानवाढीमुळे बाजरी उत्पादनात १० ते १५ टक्के घट.
  • मध्यप्रदेशमध्ये कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे सोयाबीन उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता.
  • गुजरात, महराष्ट्र तसेच कनार्टकच्या किनारपट्टी भागामध्ये अधिक नुकसान होण्याची शक्यता.
  • पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश या भागातील बटाटा उत्पादनात २०३० पर्यंत ४ ते ७ टक्क्यांनी वाढीची शक्यता तर पश्चिम बंगाल व पठारी प्रदेशातील बटाटा उत्पादनात ४ ते १६ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता.
  • आंधप्रदेश व तामिळनाडू या प्रदेशातील नारळांच्या बागायती भागामध्ये कार्बन अधिग्रहण क्षमतेत २०३० सालापर्यंत १० ते ३५ टक्के घट होण्याची शक्यता.
  • वाढलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचा फायदा उठवण्यासाठी नारळ व सुपारीच्या बागमध्ये अधिक प्रमाणात नायट्रोजन टाकण्याची गरज.

कृत्रिम सुविधांच्या साहाय्याने केलेल्या संशोधनातून मिळालेली माहिती

कृत्रिम सुविधांच्या साहाय्याने वाढवलेल्या कार्बनडायऑक्साईडमुळे तांदूळ उत्पादनावर चांगले परिणाम झालेले दिसून आले. मात्र गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झालेले दिसून आले. उदा. तांदळामध्ये प्रथिनांची कमतरता, बासमती तांदळामध्ये सुगंधात घट, शिजवलेल्या तांदळात मऊपणाचा अभाव इ. तापमान १ ते ३ अंश सेल्सियसने वाढल्यास गहू, तांदूळ व भुईमुगाच्या उत्पादनात होणारी घट अधिक प्रमाणात नायट्रोजन टाकून भरून काढता येते, असे संशोधनाअंती आढळून आले आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढवल्यास जैवभारामध्येही वाढ दिसून येते. कृत्रिम पद्धतीने तापमान १ ते ३ अंश सेल्सियसने वाढल्यास ब्राऊन प्लांट हॉपरमध्ये बरीच घट नोंदवली गेली. कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ५६० पीपीएम एवढे केल्यानंतर तांदळाच्या शेतातून मिथेनच्या उत्सर्जनात २२ वरून ५९ किलो प्रतिहेक्टरएवढी वाढ होते.

पशुधन, मत्स्यपालन आणि कुक्कुत्पालनाशी संबंधित अभ्यास संशोधन

दुध देणाऱ्या गायी व म्हशीचे शारिरिक तापमान सरसारीतून १ ते २ अंश सेल्सियसने जास्त असते. अशावेळी वातावरण बदल आणि तापमानवाढीच्या परिस्थितीत त्यांना थंड ठेवण्याची गरज भासेल. चारा-पिकात मेथी आणि मोहरी मिसळल्यास या गाईम्हशींकडून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनात घट झाल्याचे आढळून आले. मान्सूनच्या काळात ‘क्लोरोफिल ए’ च्या वाढत्या प्रमाणामुळे छोटया शाकाहारी माशांमध्ये वाढ होऊ शकते. गोडया पाण्यातील मत्स्यपालनामुळे वातावरण बदलांवर अधिक प्रतिकूल परिणाम होण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये २००९ साली कमी पावसामुळे सुमारे ९२ टक्के मत्स्यबीज उत्पादक फार्मवर प्रतिकूल झाला.

अधिक मांस देणाऱ्या कोंबडयांच्या जातीमध्ये तापमान सहन करण्याच्या क्षमतेमध्ये घट झाल्याचे आढळून येते. सरासरी तापमान ३१.६ अंश सेल्सियसवर नेल्यास कोंबडीच्या खादयामध्ये ३६ टक्के घट होते, तर अंडयांच्या उत्पादनामध्ये ७.५ टक्के घट झाल्याचे आढळून आले. बिनतुरयाच्या प्रजातीमध्ये तापमान सहन करण्याची क्षमता अधिक असल्याचे आढळून येते.

लाभप्रद परिणाम – कॅनडा, आयर्लंड यांसारख्या बरेच महिने बर्फ असलेल्या प्रदेशांमधील जमीन वातावरण बदलांमुळे (तापमान वाढ) शेतीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी समुद्रपातळीवर झालेली वाढ आणि समुद्रकिनाऱ्यावरपासून जवळच वसलेली लोकसंख्या यामुळे संकटात आलेली आहे.

वातावरणातील बदलांचा सामना करण्याचे विविध मार्ग-

  • सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे.
  • कोळसा, लाकूड, कच्चे तेल इ. चा वापर कमीत कमी करून उर्जेच्या अन्य पर्यायांचा वापर वाढवणे. (सौर/पवन/जल विद्युत)
  • जंगलतोड थांबवून वृक्षलागवडीला प्रोत्साहन देणे.
  • सेंद्रिय खतांच्या वापरातून मातीतील कार्बनचे प्रमाण वाढवणे.
  • वनीकरण शेती पद्धतीचा अवलंब करणे.
  • शेतावर पाणी साठवून ठेवण्याचे (शेततळे, कंटूर बांध, मल्चिंमं इ.) उपाय योजणे.
  • शून्यमशागत शेतीपद्धतीचा अवलंब करणे.
  • उत्पनातील वाढीसाठी शेतकऱ्यांनी (पशुपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन इ.) विविध व्यवसाय अवलंबणे.
  • तांदळाच्या शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर वाढवणे.
  • तापमान, दुष्काळ आणि अतिवृष्टीचा सामना करू शकतील अशा पिकांच्या व पशूंच्या वाणांचा विकास करणे.
  • पाणी साठवून ठेवण्याच्या व वाचवण्याच्या नवनव्या पद्धती शोधून काढणे.
  • विविध शेतीपद्धतींच्या वातावरणावर होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणामांचा अंदाज बांधून योग्य ती शेतीपद्धती शोधून काढण्यास प्रोत्साहन देणे.
  • बदलत्या परिस्थितीत पीक व्यवस्थापन पद्धतीचा आढावा घेऊन चांगल्या पीक व्यवस्थापन पद्धतीचा शोध घेणे.
  • पाणलोट क्षेत्र विकासमध्ये लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
  • हरीतगृह वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रभावी तंत्राचा विकास करणे.
  • वातावरण बदलांची गती कमी करणाऱ्या विवध उपक्रमांना (वृक्षारोपण, सेंद्रिय शेती इ.) प्रोत्साहन देणे.

            वातावरणातील बदलांमुळे सृष्टीतील काही जीव कायमस्वरूपी लुप्त होण्याची शक्यता वाढली आहे. उष्ण तसेच समशीतोष्ण कटिबंधातील विकसनशील तसेच अविकसित देशांमध्ये वातावरणातील बदलांचे प्रतिकूल परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवतील. मनुष्यप्राणी बर्फाळ प्रदेशपासून वाळवंटी प्रदेशापर्यंत पसरला आहे. परिस्थितीनुसार स्वतःला अनुकूल जीवनशैली आत्मसात करण्यास मनुष्यप्राणी सक्षम आहे, हे त्यावरून सिद्ध होते. या बदलांसाठी स्वतःला तयारीत ठेवण्याचे विविध मार्ग शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *