Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा होळीचा रंग बेरंग -भाव पडल्यामुळे शेतकरी चिंतेत !

मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा होळीचा रंग बेरंग -भाव पडल्यामुळे शेतकरी चिंतेत !

मोर्शी : होळी हा रंगांचा सण  खरेतर हा आनंदाचा, उत्साहाचा दिवस ,  रंग उधळण्याचा दिवस ,  मनातील सर्व मलीनता दूर करून सप्तरंगात बुडून जाण्याचाच हा खरा दिवस. आजवर होळीची हीच व्याख्या होती, असे म्हणावे लागेल मात्र, आज परिस्थिती खरंच तशी आहे का ? हा विचार करायला भाग पाडणारे वातावरण भोवताली आहे.

मोर्शी तालुक्यातील प्रमुख फळपीक असलेल्या संत्र्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मोर्शी तालुक्यात २२ हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतले जाते. परंतु, एकूण उत्पादनाच्या ४० टक्के संत्रा आकाराने लहान असल्याने त्याला योग्य भाव मिळत नाही. परिणामी तो एकतर मातीमोल भावाने विकावा लागतो किंवा फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रत्यक्षात असा संत्रा प्रक्रियेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे. दुर्दैवाने विदर्भात एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादक दरवर्षी त्याच त्याच समस्यांना तोंड देत आहेत. यंदा तर मृग बहाराला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे  मार्च महिना येऊन सुद्धा संत्रा झाडालाच लटकलेला आहे .संत्रा पिकाचे र्सवकष धोरण अस्तित्वात नसल्यामुळे  प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी आहे. एकेकाळी विदर्भात संत्रा मुबलक प्रमाणात निघत होता. परंतु, राज्य सरकारपाशी र्सवकष संत्रा धोरण नसल्याने स्थिती हाताबाहेर चालली आहे. डिंक्या, कोळशीचा प्रादुर्भाव, तंत्रज्ञानाचा नैसर्गिक आपत्तीचा विळखा, सिंचनाचे नगण्य प्रमाण, एकही प्रक्रिया उद्योग नसणे, निर्यातशून्य धोरण, सदोष फळपीक विमा अशी असंख्य कारणे यासाठी जबाबदार आहेत .

                    एकेवेळी भारताच्या अर्थकारणात शेतकऱ्यांना पाठीचा कणा म्हणून संबोधले जात होते परंतु या लोकशाही प्रधान देशात आता शेतकऱ्यां ऐवजी  व्यापारी व नोकर शहांचा बोलबाला वाढत चालला आहे . शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगराखाली सापडुन हतबल होऊ लागला आहे . दिवसेंदिवस शेती हा व्यवसाय तोट्याचा ठरू लागला आहे शेती व्यवसाया मधे शेतकरी तारेल असे दिसून येत नाही . 


गेल्या काही वर्षांपासून कमी होणाऱ्या  पावसाळ्यामुळे पाणीटंचाई, नापिकी, दुष्काळ वादळी पाऊस , गारपिट , शेती पिकांवर येणारे रोग , शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव , यामुळे नापिकी,पाणीटंचाई, या सर्व प्रकाराला कंटाळून वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांनी या रंगाचा बेरंग झाला आहे. खेड्यापाड्यातील भीषण वातावरणाचा रंग चढल्याने शेतकरी, शेतमजुरांच्या आयुष्यातील खरे रंगच नाहीसे झाले आहेत. किंबहुना गरिबी, कुपोषण, दारिद्रय़, महागाई या रंगात रंगलेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या वास्तवाचा भयाण रंग अन्य कुठल्याही रंगाने झाकल्या जाणार नाही, अशी परिस्थिती आहे.


सततच्या नापिकीमुळे कर्ज बाजारी होऊन शेतकरी आत्महत्या सारख्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या असून अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन होऊन मजूरी करने भाग पडत आहे .


लागोपाठ पाच वर्षांपासून अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांनाया करावा लागत आहे या वर्षी चांगला पाऊस झाला. शिवारात पिकेही जोमदार आली. पण दराअभावी शेतमाल मातीमोल झाला. मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा  ३५ ते  ४० हजार रुपये टन विकला जाणारा संत्रा ६ ते १० हजार रुपये टन विकला जात आहे .  कापूस, सोयाबीनसारख्या पिकांच्या बाबतीत क्विंटलमागे सुमारे दीड ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांवरही तीच गत ओढावली आहे. तुरीचा दर चार हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. हमीभावानुसार शेतकऱ्यांना क्विंटलमागे   हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

            या दृष्टचक्रात शेतकरी सापडल्यामुळे कर्ज, व्याज, चक्रवाढ व्याजाचे दुष्टचक्र सततची नापिकी, दुष्काळ आणि दरातील अभावामुळे गेल्य अनेक    वर्षांपासून शेतकरी संकटात सापडला आहे नोटबंदीपासून संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे भीषण दुष्काळामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे .

            असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले असून  पाणीटंचाई, शेतमालाला न मिळणारा भाव, बोगस बियाणे आणि हमखास दगा देणारा पावसाळा अशा दुष्टचक्रात सापडलेल्या ग्रामीण भागाला धुळवडीचेही अप्रूप नाही. होळीसाठी हवी असते जगण्याची उमेद. मात्र, ग्रामीण भागात भविष्याच्या आशेचा किरण दिसत नसल्याने उद्विग्न मन:स्थिती सर्वत्र आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने दोनवेळच्या भाकरीची सोय करणे कठीण झाले आहे. सणासुदीला गोडधोड करून खाण्याचा विचारही ग्रामीण भागातील जनता करू शकत नाही, अशी स्थिती आहे. मोर्शी तालुक्यातील शेतकर्‍यांना अशा स्थितीत जगणार्‍यांना दिलासा द्यायचा तरी कसा . ग्रामीण भागात रोजच्या जीवनाची होणारी होळीच परिचयाची आहे. आता समाजातील प्रत्येक घटकानेच याविरुद्ध एकत्र येऊन काही काम करण्याची गरज आहे. तरच  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील होळीचे रंग पूर्ववत् होण्याची आशा आहे.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *