Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / अमरावती गार्डन क्लब, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग राबविणार “वृक्ष पालकत्व अभियान”

अमरावती गार्डन क्लब, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग राबविणार “वृक्ष पालकत्व अभियान”

अमरावती : अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या पुढाकारातून अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि गार्डन क्लब अशा तीन शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कार्यसंस्थाची सांगड घालण्यात आली. अमरावती शहराच्या इतिहासात एक वेगळे पान जपणाऱ्या अमरावती गार्डन क्लबच्या पुढाकारातून श्रीकृष्ण आणि रुख्मिणीच्या वरदानातून नैसर्गिक सौंदर्याचे देणं लाभलेल्या अमरावती शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित अमरावतीचे स्वप्न साकारण्यासाठी “वृक्ष पालकत्व अभियानाची” संकल्पना मांडण्यात आली आहे. शहरभरातील मुख्य रस्त्यांच्या सौन्दर्यीकरणाची आणि वृक्षलागवडीच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली आहे. गार्डन क्लबच्या तज्ञ मार्गदर्शनातून शहराच्या विविध रस्त्यांवर दोन्ही बाजूला वृक्ष आणि डिव्हायडरमध्ये विविध फुलझाडांची लागवड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अनेक वर्षांच्या सौंदर्यीकरण आणि वृक्षलागवड कार्यक्रम आणि त्यांच्या फलनिष्पत्ती लक्षात घेता झाडांची लागवड केल्यानंतर तण, पोषण आणि पाण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्या जात नाही. त्यामुळे झाडांची जगण्याची आणि वाढ होण्याची शक्यता मावळते व याकामी वापरण्यात आलेले मनुष्यबळ, पैसा आणि प्रयत्न व्यर्थ जातात आणि परिणामी जनतेत प्रचंड नाराजी निर्माण होते. लोकसहभागातून या अडचणीवर प्रभावीरीत्या मात करून शहराच्या विकासात प्रत्येक परिवाराचा सहभाग व्हावा या मा. सौ सुलभाताईच्या भूमिकेतून अमरावतीकराना “वृक्ष पालकत्व अभियान”  या सामाजिक कार्यात सामावून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

अभियानाचे स्वरूप:

सामाजिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते विकास, सौंदर्यीकरण, वृक्षलागवड, ई. कार्य संपन्न झाल्यानंतर शहरातील त्या त्या भागातील रहिवासी मुख्यत्वेकरून सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून सदर अभियान राबविण्याची प्रमुख कल्पना आहे. या अभियानाअंतर्गत ठराविक भागातील वृक्ष आणि जवळपासचा परिसर नागरिकांच्या स्वेच्छेने निश्चित करून त्याचे दायित्व सोपविण्यात येणार आहे. कुटुंब प्रमुख आणि संपूर्ण परिवाराने या संवर्धन कार्यात जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित आहे. एका कुटुंबाने एक अथवा जास्तीतजास्त तीन वृक्षांचे पालकत्व स्वीकारावे आणि त्या वृक्षांची तसेच त्या समोरच्या डीव्हायडर मधील फुलझाडांची आणि सभोवतालच्या परिसरातील स्वच्छतेची काळजी या परिवाराने घ्यावी. याकरिता लागणारे सर्व सहकार्य अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि गार्डन क्लब सातत्याने करण्यास कटिबद्ध आहे. यासाठी कुठलाही खर्च नागरिकांना करावयाचा नसून फक्त समन्वय साधून आपला परिसर नियंत्रित ठेवायचा आहे.

सहभागासाठी कार्यप्रणाली तथा समयसारणी :

१.      विभागनिहाय अमरावती गार्डन क्लबद्वारा स्थापित “वृक्ष संरक्षक दल” च्या माध्यमातून योजना कार्यान्वित होणार – दिनांक २९ डिसेंबर २०२० पासून

२.      नागरिकांनी अमरावती गार्डन क्लबद्वारा विकसित ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेतून दिलेल्या यादीतून आपल्या सोयीनुसार किमान तीन ते पाच वर्षासाठी पालकत्व स्वीकारण्यासाठी परिसर आणि वृक्ष निवड  करणे : दिनांक २९ डिसेंबर २०२० ते १४ जाने २०२१

३.      ऑनलाईन नोंदणी अर्ज: https://tinyurl.com/gardanclubabhiyan

४.      अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि गार्डन क्लब यांच्या समन्वयातून वृक्ष निवड यादी जाहीर करण्यात येणार: दिनांक १५ जानेवारी २०२१

५.      प्रत्येक वृक्ष आपला परिवार सदस्य व्हावा आणि त्यासोबत वेळ घालवता यावा यासाठी बसण्याची तसेच झाडाला पाणी पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण होणार.

६.      सर्व वृक्ष, डीव्हायडर मधील फुलझाडे आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करून आणि पोषण पुरविल्यानंतर नागरिकांना हस्तांतरित होणार : दिनांक १७ जानेवारी २०२१

७.      दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी विशेष कार्यक्रमात अमरावती गार्डन क्लब, महानगरपालिका, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत संबंधित परिवाराचे “वृक्ष पालकत्व विधान” साक्षांकित होणार.

८.      अडचणी निवारणासाठी संबंधित परिवाराने गार्डन क्लबच्या “वृक्ष संरक्षक दल” सोबत संपर्क करावा.

            कठोरा रोड परिसर “वृक्ष संरक्षक दल”  डॉ दिनेश खेडकर, ९४२३६२२२८७,डॉ विशाखा महाशब्दे,  

            ९८६००४९६७६, डॉ. अमोल महल्ले,९४२१८२२८०८, सौ नीलिमा विखे, ८२०८४३८८३७,श्री  

            गौरखेडे, ९९७५२९१२५३,सौ अपर्णा धोटे, ९४२२८६५२५१.
आपला परिसर आपली जबाबदारी:

शासकीय यंत्रणेअंतर्गत महानगर पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक संस्था म्हणून अमरावती गार्डन क्लब आणि अभियानात दायित्व स्वीकारणाऱ्या नागरिकांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील:

अमरावती महानगर पालिका: वृक्षांचे संरक्षण व मोकाट जनावरांचा बंदोबस्त

सार्वजनिक बांधकाम विभाग: वृक्ष लागवड नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यवहन 

अमरावती गार्डन क्लब: वृक्ष आणि फुलझाडे यांची निवड, पोषण इत्यादी बाबतीत तज्ञ मार्गदर्शन आणि “वृक्ष संरक्षक दल” मार्फत नियंत्रण

सहभागी परिवार:  किमान तीन ते पाच वर्षासाठी पालकत्व स्वीकारलेल्या परिसर आणि वृक्षांची निगा राखणे, तण निर्मुलन, स्थायी बाटलीमध्ये पाणी भरणे, पोषण करणे, विशेष अडचणी “वृक्ष संरक्षक दल” पर्यंत पोहोचविणे.

लोकसहभागातून एक पर्यावरण पूरक आणि समाजोपयोगी अभियान राबविण्याचा अनोखा प्रयत्न अमरावती शहरात होत आहे. केवळ वृक्षारोपण न करता त्या वृक्षाचे यथोचित संगोपन होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा यामागे मुख्य उद्देश आहे. संपूर्ण अमरावती शहराचे उद्दिष्ट्य असलेल्या या अभियानाची सुरुवात प्रायोगिक तत्वावर करण्यासाठी कठोरा नाका ते कठोरा गाव या मुख्य रस्त्याची निवड करण्यात आली असून मा. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते “वृक्ष पालकत्व अभियानाचा” शुभारंभ रविवार, दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी  सकाळी ७:०० वाजता रिंगरोड चौकातून होणार आहे. या अभियानास अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि गार्डन क्लबद्वारा करण्यात येत आहे.

अभियानासंबंधित विस्तृत माहिती अमरावती गार्डन क्लबचे संकेतस्थळ www.agca.webs.com वर उपलब्ध आहे. तसेच पुढील मोबाईल क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल – अमरावती गार्डन क्लब अध्यक्ष- डॉ. दिनेश खेडकर 9423622287, उपाध्यक्ष- श्री. सुभाष भावे ९४२३४२६४२४, कोषाध्यक्ष- डॉ. शशांक देशमुख ९८९०९२८४१० आणि सचिव- डॉ. रेखा मग्गीरवार ९८२२५७६०६६, सहसचिव– डॉ गणेश हेडाऊ ९४२०७१४२८६

लोकसहभागातून होणारे विकासकार्य नक्कीच शाश्वत स्वरुपात असणार आहे. या अभियानाला अमरावतीकर भरघोस प्रतिसाद देतील आणि आपला परिसर, आपली अमरावती नक्कीच स्वच्छ, सुंदर व सदाहरित ठेवण्यात सहयोग देतील याची खात्री आहे – सौ. सुलभाताई खोडके, आमदार अमरावती

या अभियानाअंतर्गत महानगर पालिका आणि सर्वसामान्य नागरिक प्रथमतःच हातात हात घेऊन कार्य करतील. महानगर पालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रभावीपणे काम करून सर्वोतोपरी अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करणार – श्री. प्रशांत रोडे, आयुक्त, अमरावती महानगरपालिका

या अभियानाच्या माध्यमातून जनतेची बहुमोल मदत आम्हास लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण जबाबदारीने अमरावतीकरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, संवर्धन आणि पालन पोषणासंबंधित वेळोवेळी नागरिकांनी केलेल्या सूचना आणि मदतीच्या आवाहनास आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ – श्री. एस. पी. थोटांगे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

अमरावतीकरांना सातत्याने निसर्गाच्या नवनवीन छटा दाखविण्याचे काम अमरावती गार्डन क्लब अनेक माध्यमातून करीत असते. पालकत्व स्विकारलेले वृक्ष नागरिकांच्या परिवारातील सदस्य होईल. या महत्वाकांक्षी अभियानाच्या संकल्पनेतून नवा आदर्श घडेल. संपूर्ण परिवार झाडांशी गप्पा मारत एकत्रितपणे कट्ट्यावर बसून असलेले दृश्य नव्या सामाजिक रचनेची नांदी ठरेल – डॉ दिनेश खेडकर, अध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *