Job card Download Online जॉब कार्ड कसं मिळवायचं? ऑनलाईन यादी तपासण्यापासून ते ग्रामपंचायतीतून अर्ज करण्यापर्यंत प्रक्रिया समजून घ्या
सध्या घरकुल योजनेसह विविध सरकारी योजनांसाठी जॉब कार्डची मागणी होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा नंबर किंवा जॉब कार्ड डाऊनलोड करण्याची गरज भासत आहे. विशेषतः ज्या नागरिकांना घरकुलसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यांना अर्जामध्ये जॉब कार्डचा नंबर टाकणे बंधनकारक आहे. त्यामुळे ‘जॉब कार्ड कसं काढायचं’ किंवा ‘ते कुठून मिळणार’ याबद्दल स्पष्ट माहिती असणं गरजेचं आहे.
ऑनलाईन यादीत नाव तपासणं
जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम Google वर “NREGA Gram Panchayat” असं टाईप करून सर्च करायचं. त्या ठिकाणी nrega.nic.in ही अधिकृत वेबसाईट उघडावी लागते. त्यात “Panchayat” या पर्यायावर क्लिक करून पुढे ‘Generate Report’ वर जायचं आहे. तिथं राज्य – महाराष्ट्र, नंतर वर्ष – 2025-26, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडून “Proceed” या बटणावर क्लिक केल्यावर आपल्या गावातील जॉब कार्डांची यादी समोर येते.
ही यादी मोठी असते, त्यामुळे मोबाईल ब्राउझरच्या ‘Find in Page’ या पर्यायाचा वापर करून आपलं किंवा कुटुंबातील सदस्याचं नाव टाकून सर्च करावं. नाव सापडल्यानंतर जॉब कार्ड नंबरवर क्लिक केल्यास कार्ड ओपन होतं आणि तिथून ते डाऊनलोड करता येतं.
यादीत नाव नसेल, तर नवीन जॉब कार्डसाठी अर्ज
जर या यादीत तुमचं नाव नसेल, तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा ग्रामरोजगार सेवकाशी संपर्क साधावा लागतो. जॉब कार्डसाठी नमुना क्र. 1 चा अर्ज भरावा लागतो, ज्यामध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव आणि कुटुंबातील 18 वर्षांवरील सदस्यांची माहिती भरली जाते.
जॉब कार्ड हे ‘रोजगार हमी योजने’साठी असते, त्यामुळे फक्त 18 वर्षांवरील व्यक्तींचं जॉब कार्ड तयार केलं जातं. हे अर्ज ग्रामपंचायतीत सादर केल्यावर एक ते दोन दिवसांत तुमचं नाव यादीत समाविष्ट केलं जातं आणि तुम्ही नंतर कार्ड डाऊनलोड करू शकता.
तातडीने जॉब कार्ड नंबर हवा असल्यास
कधी कधी तातडीची गरज असते – उदाहरणार्थ घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली असते. अशा वेळी थेट ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना तुम्हाला तात्काळ जॉब कार्ड नंबरची गरज आहे हे स्पष्टपणे सांगावं. अनेक वेळा एकाच दिवसातही जॉब कार्डचा नंबर मिळवणं शक्य होतं.
निष्कर्ष
जॉब कार्ड ही केवळ रोजगार हमी योजनेसाठी मर्यादित नसून, ती घरकुल, शौचालय योजना, पाणी टाकी, शेततळं इत्यादी विविध योजनांसाठी आवश्यक असते. त्यामुळे ज्या नागरिकांना हे कार्ड मिळालं नाही, त्यांनी यादीत नाव तपासून लगेच अर्ज करावा. आणि ज्यांचं कार्ड यादीत आहे, त्यांनी ते डाऊनलोड करून जवळ ठेवणं गरजेचं आहे. वेळ वाचवण्यासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया घरबसल्या करता येते, याचा लाभ सर्वांनी घ्यावा.