Panjabrao Dakh प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 6 मेपासून 14 मेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर नसेल, तर भाग बदलत-बदलत पुढे सरकणार आहे.
नंदुरबारपासून सुरुवात, नंतर नाशिक, मराठवाडा, विदर्भाकडे
4 मे रोजी नंदुरबार भागात पावसाचा अंदाज आहे. 5 मे रोजी तो नाशिककडे, 6 तारखेला मराठवाड्याकडे, 7 मे रोजी विदर्भाकडे, आणि पुढे 13-14 मेपर्यंत पाऊस वेगवेगळ्या भागांत सरकत जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना – कांदा झाकून ठेवा
विशेषतः नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी डख यांचे आवाहन आहे की 4 ते 6 मेच्या दरम्यान आपला कांदा व्यवस्थित झाकून ठेवावा. पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून वेळेवर व जोरदार येण्याची शक्यता
डख यांनी सांगितले की समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यंदा 19 मे रोजी अंदमानमध्ये मान्सूनची पहिली हजेरी लागणार आहे. त्यानंतर सुमारे 22 दिवसांत मान्सून केरळमध्ये आणि मग 15-16 जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
विजेपासून खबरदारी घेण्याचे आवाहन
डख यांनी शेतकऱ्यांना इशारा दिला आहे की, पावसात विजांचा जोर असेल. त्यामुळे जनावरे झाडाखाली बांधू नयेत आणि विजा कडकडत असताना लोकांनीही झाडाखाली थांबू नये. शक्य असल्यास सुरक्षित घरात थांबावे.
मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी
मुंबई आणि पुणे परिसरातही पावसाची शक्यता असून, उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळणार आहे. काही दिवस पावसात भिजण्याची संधी मुंबईकरांना मिळेल, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, दिल्लीसह अन्य राज्यांनाही पावसाचा फटका
महाराष्ट्रासोबतच गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांतही 6 ते 14 मेच्या दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.