महिना संपण्याआधीच खात्यात जमा होणार हप्ता
लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याविषयी सर्वत्र चर्चा सुरू असताना, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. “महिना संपण्याच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
आनंदाची बातमी – पात्र महिलांना वेळेवर मिळणार लाभ
या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “लाडकी बहिण योजना ही नव्याने सुरु करण्यात आलेली नाही, तर ती जून-जुलै 2024 पासूनच सुरू आहे. शासनाने निर्गमित केलेल्या मूळ शासन निर्णयानुसार (GR) केवळ अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ५०० रुपये
अदिती तटकरे यांनी पुढे सांगितलं की, काही महिला अशा आहेत ज्या आधीपासून संजय गांधी निराधार योजना किंवा नमो शेतकरी सन्मान योजना यांचा लाभ घेत आहेत. त्या महिलांना आधीच 1,000 रुपये मिळत असल्यामुळे, लाडकी बहिण योजनेतून फक्त 500 रुपये दिले जातात. शासनाचा उद्देश असा आहे की एकूण मिळणारा थेट लाभ किमान 1,500 रुपये असावा.
विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे – तटकरे
मंत्री तटकरे म्हणाल्या, “यामध्ये काहीच नवीन नाही. विरोधक किंवा काही माध्यमांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे, त्यामुळे समाजात गोंधळ निर्माण होतो. पात्र महिलांना नियमांनुसार आणि वेळेत लाभ दिला जात आहे, यात कोणतीही शंका नाही.”
2.47 कोटी लाभार्थ्यांची यादी तयार, प्रक्रिया पारदर्शक
सध्याच्या आकडेवारीनुसार 2 कोटी 47 लाख महिलांचा लाभार्थी यादीत समावेश आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये दिलेल्या शेवटच्या हप्त्यादरम्यान 2 कोटी 33 लाख महिलांना लाभ मिळाला होता. शासनाने स्पष्ट केलं आहे की, लाभ वाटपाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे आणि कामात कोणताही अडथळा नाही.