hawamaan andaaz काल नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा येथे गारपीटसह पावसाच्या सरी झाल्या. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातही अंदाजाप्रमाणे रात्री पाऊस झाला. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्यप्रदेशकडे सरकत असून अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा कायम आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे आणि वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. पश्चिमी आवर्ताचा ट्रफ असल्याने ढगांची दिशा बदलत आहे आणि त्यामुळे पावसाचे ढग विविध भागांमध्ये सरकत आहेत.
नंदुरबार, मुंबई आणि पालघर परिसरात पावसाचे ढग दाटले
सध्या नंदुरबारच्या पश्चिम भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग दाखल झाले आहेत. मुंबई आणि पालघरच्या किनारपट्टी भागातही समुद्राच्या जवळ पावसाचे ढग दाटले असून गडगडाटी पावसाची शक्यता आहे. ढगांची हालचाल दक्षिणेकडून पूर्वेकडे, आणि पुढे उत्तर-पूर्वेकडे होत आहे. नाशिक, धुळे, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागांत ढगाळ वातावरण आहे, मात्र या ठिकाणी पावसाचे ढग फारसे दिसत नाहीत.
येत्या २४ तासांत कोकण व उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, काही भागांत गारपीट संभव
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगरचे उत्तर व पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना आणि बुलढाणा या पट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता, काही ठिकाणी गडगडाट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. सातारा, पूर्व पुणे, सांगली, धाराशिव, सोलापूरचा उर्वरित भाग, लातूर, नांदेड, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये फक्त स्थानिक ढग तयार झाल्यासच हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही.