Bhendwal Ghatmandni Buldhana पीक पाण्याचा अंदाज सकारात्मक, पण देशासाठी संकटाचा इशारा
भेंडवळ (जि. बुलढाणा): आज भेंडवळ गावात 350 वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक भाकडूक वाचनाची परंपरा यथावकाश पार पडली. या अनोख्या विधीत यंदाही निसर्ग, शेती, देशाची स्थिती आणि भविष्यातील संकटांचा संकेत देणारी भाकडूक जाहीर करण्यात आली.
यंदा पीक पाणी सामान्य राहील, असा आशादायक संदेश शेतकऱ्यांना मिळाला आहे. विशेषतः पावसाच्या संदर्भात अंदाज देताना सांगितले गेले की, पहिला महिना कमी-अधिक, दुसरा महिना चांगला, तिसरा महिना साधारण आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
देशावर संकटाची छाया; राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेचा इशारा
यंदाच्या भाकडूकीत देशावर मोठ्या संकटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे संकेत भाकडूक वाचनात दिसून आले. याचबरोबर, देशातील ‘राजाची गादी’ अनिश्चित राहील, त्यामुळे आर्थिक स्थिती तणावपूर्ण राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
पावसाचा सकारात्मक अंदाज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण आहे. पीकपाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण योग्य राहिल्यास चांगले उत्पादन मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.