Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / कास पठार : निसर्ग रंगांची उधळण की दुरुन डोंगर ? www.vishalraje.com

कास पठार : निसर्ग रंगांची उधळण की दुरुन डोंगर ? www.vishalraje.com

सह्याद्रीच्या पर्वतराजीत रुंजी घालणारा वारा, उंंचच उंच डोंगर रांगा, त्या पर्वतरांगांनी ल्यालेला हिरवाकंच शालू, शिळ घालणारे पक्षी, आणि जणू जरतारी पैठणीवर नाचरा मोर साकारताना केलेली नाजूक कलाकुसर अनुभवायची असेल तर थेट कास पठार गाठायला हवे. सातारा शहरापासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील हे फुलांचे पठार, म्हणजे निसर्गाने खुले केलेले सौंदर्य, आनंदाचे कोठारच आहे. 

निसर्ग भरभरून देतो, म्हणजे काय हे अनुभवायला मिळतं ते सातारा – कास या मार्गावर. कास पठार गाठताना विविध तळी, अढळ सह्याद्रीची उंच शिखरे आणि त्यातून शिळ घालत फिरणारा मनमोकळा वारा यांची सोबत मिळते, आणि मन तरतरीत होतं. वर्षातील केवळ तीन महिन्यांसाठी निसर्गाचा हा चमत्कार इथे बघायला, अनुभवायला मिळतोे. पावसाळा संपता – संंपता पठारावरची धरित्री अनेकरंगांचा साज चढवते. मनमुराद भरभरून सौंदर्य दर्‍या – खोर्‍यातून ओथंबून वाहतंं. कास तळं कमलदलांनी झाकलं जातं आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेल्या पठारावरील काळाकभिन्न, कठोर खडक अक्षरशः रंगून जातो. बेसॉल्ट खडकाच्या उंच डोंगरावर नैसर्गिकरित्या तयार झालेलं कास पठार हे पर्यटक आणि अभ्यासकांचंं आवडीचं ठिकाण. आजुबाजुचा परिसर दाट हिरवाईने नटलेला, नागमोडी रस्ते, मोकळी – शुद्ध हवा आणि शहराच्या कोलाहलापासून निवांत असं सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गसंपन्न कास पठार नेहमीच पर्यटकांना भूरळ घालतं. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यात लाखोे पर्यटकांंची हजेेरी येथे ठरलेली. तब्बल ९० हेक्टर परिसरात फुललेली विविधरंगी चिमुकली फुलं म्हणजे या विस्तीर्ण पठारावर पसरलेला रंगीबेरंगी गालिचा असल्याचा आभास निर्माण करणारी. जिथवर नजर जाईल तिथवर पर्यटकांना, अभ्यासकांना, निसर्गप्रेमींंना विविधरंगी फुलांच्या या पायघड्या घातलेल्या दिसतात. लाल, जांभळी, पिवळी, पांढरी गवती झुडपांवर फुललेली फुलं म्हणजे निसर्गाने केलेली कलाकुसरच. सोबतीला अत्यंत प्रसन्न वातावरण, ग्रामीण खाद्यसंस्कृतीनुसार असलेले विविध खाद्यपदार्थ आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ग्रामस्थां होणारे स्वागत यामुळे कास पठार एक ’हॉट डेस्टीनेशन’ ठरलंय. मुंबई – पुणे या शहरांपासून एक दिवसांत भेट देऊन निसर्गसौंदर्य नजरेत साठवून परत येणं इथे सहज शक्य आहे. 

–असा लागला शोध :

कास पठार म्हणून जो परिसर विविध फुलांनी आणि पर्यटकांंच्या गर्दीने आज फुललेला दिसतो, त्या परिसराला खरी ओळख मिळाली ती सन २०११ मध्ये दाखल झालेल्या युनेस्कोच्या एका चमूमुळे. ऑस्ट्रेलियातील पठाराप्रमाणेच सह्याद्रीच्या या पठरावरही निसर्गाची मुक्तहस्ताने रंगांची उधळण होते, हे त्या चमूच्या दौर्‍यातून जगासमोर आले. तोपयर्र्ंत या पठारावर काहीही न पिकणारी ६० हेक्टर शेती सांभाळणारेे ३६ शेतकरी आणि वनविभागही या संपदेपासून अनभिज्ञ होते. संयुक्त वन व्यवस्थान ग्रामीणांच्या सहभागातून वनांचे रक्षण व गावांंचा विकास साधणार्‍या संयुक्त वनव्यवस्थापन समितीची स्थापना तत्कालीन जिल्हा वनाधिकारी प्रवीण यांंनी युनेस्कोच्या चमुच्या दौर्‍यानंतर केली. या माध्यमातून कास आणि परिसरातील गावकर्‍यांची एक समिती स्थापन करून कास पठाराची देखभाल, पर्यटकांना सुविधा देण्यात येऊ लागल्या. दोन वर्षापूवीर्र् पठाराच्या पायथ्याशी असलेल्या सहा गावातील गावकर्‍यांनी मिळून कास पठार कार्यकारी समिती स्थापन केली, यात सहा गावातील १८ सदस्य आहेत. तीन महिन्यात प्रवेश शुल्कातून मिळणार्‍या एका कोटी रुपयातून या समितीने दीडशे स्थानिकांना रोजगार दिला आहे. तर सहा गावांमध्ये रस्ते, गॅस, दिवे आदी विकास कामेही केली आहेत. वनवासियांकडून रक्षण कोणत्याही निसर्ग पर्यटनस्थळांचं पावित्र्य, सौंदर्य कुठलीही कृत्रिमता न आणता जपणं हेच खरं कौशल्य असतं. ते कौशल्य कास पठाराच्या परिसरातील एकीव, कास, अटाळी, कसाणी, पाटेघर, कुसुंबीच्या गावकर्‍यांनी आत्मसाद केलं आहे. ६० हेक्टर खासगी आणि उर्वरित वनविभागात मोडणार्‍या या पठाराचे रक्षण, लाखो पर्यटकांचं आगतस्वागत या परिसरातील दीडशे ग्रामस्थ करतात. त्यासाठी कास पठार कार्यकारी समितीची स्थापना या मंडळींनी केली आहे. पयर्र्टकांंची कुठलीही गैरसोय होऊ नये आणि निसर्गसंपदेचे नुकसान होऊ नये, याची पुरेपुर काळजी ही समिती आणि वनवासी घेतात. 

पर्यटकांसाठी सुविधा : कास पठार येथे भेट देण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोेबर, नोव्हेंबर हा हंगाम सर्वाधिक चांगला आहे. याठिकाणी पर्यटकांना प्रत्येकी १०० रुपये भरून प्रवेश दिला जातो. किंवा त्यासाठी ऑनलाइन बुकींग करता येते. त्यानंतर दिवसातील तीन – तीन तास ठरवून देण्यात आले आहेत. सकाळी सात ते दुपारी एक, एक ते चार आणि चार ते सात असा कालावधी ठरवून देण्यात येतो. त्यानुसार पर्यटक पठारावर जाऊ शकतात. पठाराच्या पायथ्याशी निःशुल्क वाहनतळ तयार करण्यात आले आहे. तेथून केवळ दहा रुपयात पठारापयर्र्ंत नेण्यासाठी आठ मिनीबसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पठाराच्या पायथ्याशी आणि परिसरात अनेक लहान – मोठी हॉटेल, रिसॉर्ट आहेत. 

मात्र, कास पठारची दुसरी बाजुही आहे. तीसुद्धा नक्की वाचून मगच पर्यटकांनी ठरवायला हवं.

मारुतीची बेंबी आणि कास पठार 
एक मुलगा गावाबाहेरच्या मंदिरात जातो. तिथे हनुमानाची मोठ्ठी मुर्ती असते. थोडावेळ थांबल्यानंतर कंटाळलेला मुलगा मूर्तीच्या खोेल बेंबीत बोट घालतो… त्या बेंबीत असलेला भूंगा त्या मुलाच्या बोटाला कडकडून चावतो… तेवढ्यात त्याचेे मित्र येतात… काय झाले म्हणून विचारू लागतात. तर तो मुलगा म्हणतो मारुतीच्या बेंबीत बोट घातलं की थंडगार वाटतं… हे ऐकून दुसरा तेच करतो. त्यालाही भूंगा कडकडून चावतो. मग पाठोपाठ इतरही मुलं तसंच करू लागतात. सगळ्यांच्या बोटाचा भूंग्याने चावा घेतल्यानंतरही ती मुलं मारुतीची बेंबी थंड असल्याचंच सांगत सुटतात… लहानपणी ऐकलेली ही गोष्ट अचानक परवा आठवली, ती कास पठारला भेट दिल्यानंतर. अहाहा, किती सुंदर, निसर्गाची किमया असं काहीतरी लाखो लोक कास पठारावर फुलं फुलली की जाऊन आल्यानंतर सांगत असतात. फुलांचे गालीचे काय, रंगांची उधळण काय असं खूप काही ऐकू येतं. अशा बर्‍याच लोकांनी केलेल्या वर्णनामुळे आम्ही कास पठारावर जाऊन आलो, आणि हा मारुतीच्या बेंबीचा किस्सा आठवला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठ वर्षापैकी केवळ दोन वर्षांपूर्वी हे पठार फुलांनी झाकले गेले होते. त्यानंतर कधीही तितकी फुलं फुलली नाहीत. मग आम्हाला तो फुलांचा गालीचा दिसणार कसा? गवती फुलांचे थोड्या थोड्या अंतरावरील ताटवे दिसले, पण त्याने समाधान झाले नाही. असो, सह्याद्रीच्या कुशीतील कास पठारावर जाण्यासाठीची वळणे, तिथली हवा, हवेतील गारवा, दृष्टी पोहचेल तिथपर्यंतचं मोकळं पठार हे सगळं सुखावणारं असतं… पण ते कायम घड्याळ्याच्या काट्यावर नाचणार्‍यांसाठी अन् गर्दीत हरवून गेलेल्यांंसाठी. तसेच पर्यटक इथे गर्दी करताना दिसले. काहीच फुलं नाहीत, म्हणून तिथल्या कार्यकारी समितीच्या पदाधिकार्‍यांशी भांडतानाही काही दिसले. म्हणजे जंगलातील फुलं ही निसर्गाच्या इशार्‍यावर फुलतात, त्यात त्या समितीचा काय दोष, हे न कळणारे ’शहरी’ त्या गर्दीत होते. खूप अपेक्षा ठेऊन गेल्यानंतर अपेक्षाभंग होतो, तसा तो आमचा झाला. कारण वळणं, ती हवा, गारवा हे सगळं सातपुड्याच्या पर्वतराजींमध्ये अनुभवल्यानंतर नवं होतं ते पठारावरील फुलं पाहणं. पण त्याबाबत भ्रमनिरास झाला.एक समाधानकारक बाब मात्र दिसली ती म्हणजे कास पठाराच्या भोवताली असलेल्या जंगलातील सहा गावांनी या माध्यमातून उभारलेला मोठा पर्यटन व्यवसाय. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या (जेएफएम) माध्यमातून त्यांनी कास पठार हे शेकडो ग्रामस्थांच्या रोजगाराचे साधन शोधले आहे. वन विभागाची नेहमीप्रमाणे उदासिनता असताना किंवा जाचक आणि निरुपयोगी वनकायद्यांची अडचण असतानासुद्धा ग्रामस्थ याठिकाणी खूप चांगले काम करीत आहेत. कास पठार कार्यकारी समितीने पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी मोठं वाहनतळ, बसची सोय केली आहे. पठारावर ज्या शेतकर्‍यांंची मालकी आहे, ते शेतकरीही याठिकाणी विविध खाद्यपदार्थ विकून रोजगार मिळवतात. तर पठाराच्या परिसरातील गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी जेएफएम समिती पुढाकार घेत आहे. हे पाहून खूप आनंद झाला. कारण जेएफएम ही बुलडाण्याचे तत्कालीन डीएफओ डॉ. मोहन झा यांची संकल्पना वनविभागाने स्वीकारली त्यानंतर त्या संकल्पनेचं यश सह्याद्रीच्या कुशीत बघायला मिळालं, याचा आनंद मोठा होता. फुलं अगदीच तुरळक असली तरीही एकीव, कास, अटाळी, कासाणी, पाटेघर, कुसुंबी येथील गावकर्‍यांचे संयुक्त प्रयत्न नक्कीच फुलले आहेत, फळले आहेत हे पहायला मिळालं. 

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *