Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / पोहरादेवी, उमरी खुर्द येथील यात्रा रद्द; २३ मार्चपासून ८ वाहतूक मार्ग राहणार बंद

पोहरादेवी, उमरी खुर्द येथील यात्रा रद्द; २३ मार्चपासून ८ वाहतूक मार्ग राहणार बंद

वाशिम : राम नवमी दरम्यान पोहरादेवी, उमरी खुर्द येथे यात्रेनिमित्त देशभरातून लाखो भाविक येतात. मात्र सध्या देशात, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोहरादेवी, उमरी खुर्द येथे २५ मार्च २०२० ते २ एप्रिल २०२० दरम्यान होणारी यात्रा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये रद्द करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा कोरोना विषाणू प्रतिबंधक मोहिमेचे नोडल अधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच २३ मार्चपासून पोहरादेवीकडे जाणाऱ्या ८ मार्गांवरील वाहतूकही ठेवण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात जनावरांपासून झाल्याचे लक्षात आले आहे. पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान व उमरी खु. येथील यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आणली जातात. या पशुमधून साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. पोहरादेवी, उमरी खु. यात्रा कालावधीत देशभरातून येणाऱ्या भाविकांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आल्यास इतर हजारो भाविकांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेमध्ये जमलेल्या भाविकांना या विषाणूचा संसर्ग होवू नये, याकरिता पोहरादेवी, उमरी खुर्द येथे येणाऱ्या व्यक्ती, भाविकांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ३ मार्च २०२० रोजीच्या प्रतिबंध आराखड्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर रहावे म्हणून गर्दी, यात्रा, मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवून जीवित हानी होवू नये, यासाठी पोहरादेवी, उमरी खुर्द येथील यात्रा रद्द करण्यात आल्याचे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

पाळीव प्राणी वाहतूक, बळी देणे, मंडप (स्टॉल) लावण्यास मनाई

पोहरादेवी व उमरी खुर्द येथे यात्रेकरिता देशभरातून भाविक येतात आणि यात्रेमध्ये पारंपारिक प्रथेनुसार बोकुड व कोंबड्या यांचा बळी देण्याची प्रथा आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्च ते २ मार्च २०२० दरम्यान होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागात पाळीव प्राण्यांचे बळी व प्राणी वाहतुकीला यात्रा कालावधीत प्रतिबंध करणे तसेच हॉटेल, प्रसाद व इतर दुकानांचे मंडप (स्टॉल) लावण्याकरिता प्रतिबंध करणे आवश्यक आहे.  

त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पोहरादेवी, उमरी खुर्द येथे २३ मार्च २०२० ते ५ एप्रिल २०२० या कालावधीत पाळीव प्राण्याचा बळी देण्यास, पाळीव प्राण्याची वाहतूक करण्यास, पाळीव प्राणी जमविण्यास व हॉटेल, प्रसाद व इतर दुकानांचे मंडप (स्टॉल) लावण्याकरिता निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा कोरोना विषाणू प्रतिबंधक मोहिमेचे नोडल अधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत.

पोहरादेवीकडे जाणाऱ्या ८ मार्गांवरील वाहतूक

२३ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान राहणार बंद

पोहरादेवी, उमरी खुर्द येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान व इतर राज्यातून लाखो भाविक राम नवमी दरम्यान होणाऱ्या यात्रेसाठी येतात. मात्र देशात, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोहरादेवी, उमरी खुर्द येथे २५ मार्च ते २ एप्रिल २०२० या कालावधीत होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरीही बाहेरून येणारी वाहने पोहरादेवी, उमरी खु. येथे आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ख) नुसार २३ मार्च ते ५ एप्रिल २०२० या कालावधीत पोहरादेवीकडे जाणारे ८ मार्ग बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा कोरोना विषाणू प्रतिबंधक मोहिमेचे नोडल अधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत.

बंद करण्यात येणारे मार्ग खालीलप्रमाणे आहेत

१.      यवतमाळ-दिग्रस-वाईगौळ-पोहरादेवी मार्ग

२.      पुसद-सिंगद-पोहरादेवी मार्ग

३.      पुसद-ज्योतिबानगर-सेंदोना-पोहरादेवी मार्ग

४.    वाशिम-धानोरा-शेंदूरजना-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग

५.     मंगरुळपीर-मानोरा-गव्हा-रतनवाडी-पोहरादेवी मार्ग

६.      कारंजा-मानोरा-पंचाळा फाटा-पोहरादेवी मार्ग

७.     गवली-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग

८.     दारव्हा-बोरव्हा-कुपटा-पोहरादेवी मार्ग

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *