Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / विदर्भ पक्षीमित्र संमेलनात ठराव लोणारला जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा बहाल करावा

विदर्भ पक्षीमित्र संमेलनात ठराव लोणारला जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा बहाल करावा

लोणार (बुलडाणा) – जगप्रसिद्ध लोणार सरोवराला जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा देण्यात यावा तसेच लोणारचा समावेश जागतिक वारसा स्थळातही करण्यात यावा, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव लोणार येथे आयोजित विदर्भ पक्षिमित्र संमेलनाच्या  समारोपीय कार्यक्रमात पारित करण्यात आले. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, विदर्भ विभाग आणि मी लोणारकर या संस्था दोन्ही ठरावांचा पाठपुरावा करेल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

लोणार येथे ज्येष्ठ पक्षीअभ्यासक अजय डोळके यांच्या अध्यक्षतेखाली विसावे विदर्भ पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले.पक्ष्यांनी आम्हाला जगाकडे कसे बघावे आणि भौतिकवादापासून दूर कसे राहावे याची शिकवण दिली. पण आम्ही पक्ष्यांना त्यांचे मित्र म्हणून काय दिले? असा प्रश्न उपस्थित करीत संमेलनाध्यक्ष डोळके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात पक्ष्यांच्या अधिवासाविषयी आपण सतत सतर्क राहून स्थानिकांशी यासंदर्भात संवाद साधला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या संमेलनाचे उद्घाटन खासदार प्रताप जाधव यांनी केले. लोणारचे पक्षीवैभव आणि वारसावृक्ष ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या संमेलनात विश्वनाथ कुळे यांचा ‘सरोवराशी जडले नाते’ हा माहितीपट दाखविण्यात आला. या संमेलनात डॉ. जयंत वडतकर यांनी प्राचीन वास्तूंवरील शिल्पांकित पक्षी, डॉ. अरविंद गजभिये यांनी आयुर्वेदातील पक्षीजगत, डॉ.मकरंद गिते यांनी शेती, शेतकरी व पक्षी सहसंबंध, मनीष राजनकर यांनी पानथळ अधिवासासंदर्भात स्थानिक लोकांची भूमिका, मनीष ढाकुलकर यांनी मेळघाटातील घुबडप्रजाती, राहूल वकारे यांनी मोठ्या करवानकाचे प्रजनन जीवशास्त्र, डॉ. संदीप साखरे यांनी कोकीळ आणि शिवलिंग बीज, नितीन मराठे यांनी नागपूर परिसरातील पक्षीजीवन, पूजा पवार यांनी दोन शहराचा पक्षी लेखाजोखा, श्याम जोशी यांनी बर्ड रेस्क्यू, राजकमल जोब यांनी विदेशातील पक्षीअभ्यास, सुहास जोशी यांनी पाणथळ अधिवास व त्याचे संरक्षण, शिवाजी जवरे यांनी अमेझिंग  फॅक्ट्स ऑफ नेचर या विषयानुरूप सादरीकरण केले. या विविध सत्रांचे डॉ. गजानन वाघ, मुकुंद धुर्वे, राजकमल जोब, प्रा. किशोर वानखडे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडेहे अध्यक्ष होते.या दोन दिवसीय संमेलन परिसरात लोणारचे पक्षीवैभव अधोरेखित करणारी छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती. संमेलनानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात आली असून अनेक पक्षीअभ्यासकांचे लेख असलेल्या या  या स्मरणिकेचे देखणे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार जगन राठोड यांनी साकारले आहे. बुलढाणा येथील अनिल दातीर यांचा आकाश निरीक्षण कार्यक्रमही सायंकालीन सत्रात घेण्यात आला. तर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पक्षी अभ्यासकांनी लोणार सरोवराला भेट दिली आणि पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटला.समारोपीय कार्यक्रमाला अजय डोळके, प्रा. डॉ. निनाद शहा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, मी लोणारकरचे कार्याध्यक्ष संतोष जाधव, योगिनी डोळके उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन अरुण मापारी यांनी केले तर आभार विलास जाधव व सचिन कापुरे यांनी मानले. या संमेलनात विदर्भ व विदर्भाबाहेरील एकूण १५० पक्षीमित्र उपस्थित होते.

प्रस्ताव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे पाठविणार
लोणारचा समावेश जैवविविधता वारसा स्थळात करण्याकरिता सदर प्रस्ताव महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, विदर्भ विभाग व मी लोणारकर यांच्याद्वारे सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांना पाठविण्यात येणार आहे. मंडळाने यापूर्वी राज्यातील सहा ठिकाणांना जैवविविधता वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील दंडारी दलदल कुही, गडचिरोली जिल्ह्यातील वडाधाम जीवाश्मपार्क, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास व अंजर्ले, जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरी जंगल आणि पुण्यातील गणेशखिंड इत्यादी वारसास्थळांचा समावेश आहे.

वारसा ते वारसा सायकल यात्रा
या संमेलनानिमित्त बहार नेचर फाऊंडेशन द्वारा सेवाग्राम ते लोणार या सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक परिप्रेक्षात सेवाग्राम आश्रम व लोणार सरोवर यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संभाव्य वारसास्थळांना जोडणाऱ्या सायकल यात्रेत किशोर वानखडे व दिलीप वीरखडे हे दोन सायकलस्वार तीनशे किलोमीटरचा प्रवास करून संमेलनात सहभागी झाले होते. 

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *