Breaking News
Home / बातम्या / उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘पुण्य भूषण’ पुरस्कार प्रदान

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘पुण्य भूषण’ पुरस्कार प्रदान

पुणे : भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असून भारताला समृध्द करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

          येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’आणि पुणेकरांच्यावतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ एस. बी. मुजुमदार, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, डॉ. के. एच. संचेती उपस्थित होते.

            उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे देशातील सर्वात सुंदर शहर आहे. शैक्षणिक केंद्र असणाऱ्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले दाम्पत्य, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यांच्यासह थोर समाजसुधारकांचा वारसा आहे. या शहरातील पुण्यभूषण पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.  

            या वर्षीचा पुरस्कार पुरातत्वज्ज्ञ डॉ. देगलूरकर यांना दिल्याने या निमित्ताने पुरातत्व शास्त्राचा गौरव झाला आहे. पुरातत्व शास्त्र हे खरा इतिहास समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपला सांस्कृतिक इतिहास उजेडात आणण्याचे काम करते. देशातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मृतीस्थळे आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम करत असतात, त्यामुळे हा समृध्द वारसा जपण्याचे काम सर्व देशवासीयांनी एकत्रितपणे करण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी, त्यांना देशाच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक स्थळांना भेटींचे आयोजन शैक्षणिक संस्थांनी करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारताची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाखालील असल्याने हा युवा वर्ग आपल्या देशाचे शक्तीस्थान आहे. या युवकांना इतिहासातून प्रेरणा मिळून त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी कौशल्याधारीत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आजच्या युवा पिढीने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन श्री. नायडू यांनी यावेळी केले.

        पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणाले, हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच मी मानतो. हा पुरस्कार पुरातत्व शास्त्राचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन आणि समृद्ध आहे, ती सर्वात प्रवाही आहे. या संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचे काम पुरातत्व शास्त्र करते.

          यावेळी वीरमाता लता नायर, स्वातंत्र्यसैनिक मोहंमद चांद शेख, सीमेवर लढताना जखमी झालेले सैनिक नाईक फुलसिंग, हवालदार गोविंद बिरादार यांचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली.

प्रास्ताविक पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी केले तर आभार डॉ. प्रभा अत्रे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *