River Linking Project पावसाळ्यात नऊ तालुक्यांना मिळणार हक्काचं पाणी
दुष्काळी मराठवाड्याच्या पाठीशी ठामपणे उभा असलेला कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या ऑगस्ट 2025 मध्ये या प्रकल्पाची चाचणी घेण्यात येणार आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला आणि प्रतिक्षेला आता सकारात्मक दिशा मिळालेली असून, मराठवाड्यातील नऊ तालुक्यांना हक्काचं सात टीएमसी पाणी मिळणार आहे.
11 हजार कोटींच्या प्रकल्पातून 7 टीएमसी पाणी मराठवाड्याला
या प्रकल्पासाठी एकूण 11,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. उजनी धरणातील पाणी निरा बोगद्याद्वारे शिना आणि शिनामार्गे मराठवाड्याच्या नऊ तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचा हा उपसा सिंचन प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास रबी हंगामात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
तालुक्यानुसार पाणीवाटपाची रूपरेषा
या प्रकल्पाअंतर्गत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला 1.68 टीएमसी पाणी मिळणार आहे. याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी, कळम आणि धाराशिव या पाच तालुक्यांना एकत्रितपणे 3.8 टीएमसी पाणी दिलं जाणार आहे. तसेच लोहारा, उमरगा आणि तुळजापूर या तालुक्यांसाठी 2.24 टीएमसी पाण्याचं वाटप होणार आहे. एकूण मिळून सात टीएमसी पाण्याची तांत्रिक चाचणी ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे.
दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर चाचणीच्या दिशेने पाऊल
हा प्रकल्प मागील २०–२२ वर्षांपासून विविध टप्प्यांत रेंगाळत होता. सुरुवातीला भोगद्यांचे काम, मंजुरी प्रक्रिया, कॅनॉलचे खोदकाम अशा अनेक अडचणींना तोंड देत शेवटी हे काम मार्गी लागले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले की, हे कॅनॉल केवळ कोरडे खड्डेच राहणार का? मात्र आता, तेच कॅनॉल उजनी धरणातून आणलेल्या पाण्याने खळखळून वाहतील, ही आशा निर्माण झाली आहे.
चाचणी यशस्वी झाल्यास रबी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा
या प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाल्यास, आगामी रबी हंगामात मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. सात टीएमसी नव्हे, तरी किमान 0.7 टीएमसी पाणी मिळालं तरी शेतकऱ्यांच्या पाण्याची गरज भागेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्याच्या भविष्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.